मृत्यूचे ज्याला स्मरण होते तोच पुण्यकर्म करतो : महंत रामगिरी
सार्वमत

मृत्यूचे ज्याला स्मरण होते तोच पुण्यकर्म करतो : महंत रामगिरी

सदगुरु गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताह

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

मृत्यूचे जेव्हा स्मरण होते तेव्हा मनुष्य पाप कर्म करत नाही. मृत्यूचे ज्याला स्मरण झाले तो पुण्यकर्म करतो. तोच साधना करू शकतो. म्हणून मृत्यूला कधी विसरू नये. स्व कल्याणासाठी मृत्यू आणि परमात्म्याला विसरू नये, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले.

योगिराज सदगुरू गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त दैनिक सार्वमतशी दूरध्वनीवरून संवाद साधतांना महंत रामगिरीजी बोलत होते. त्यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून भयाची कारणे, अध्यात्माचे महत्त्व, वैराग्य यावर प्रकाश टाकत श्रीमद भागवतातील विविध प्रसंगात जिवंतपणा आणला. ते म्हणाले, वैराग्य हे अभय प्रदान करणारे असते. म्हणून भगवान शिव स्मशानात राहतात. कारण स्मशनात मृत्यूचे स्मरण होते. सर्वांगाला चिता भस्म लावतात, कारण माझेही एक दिवस असेच भस्म होणार आहे, याचे स्मरण होते.

मृत्यू आणि पुण्य !

मृत्यूचे जो स्मरण करतो, तो पुण्य करतो. मृत्यूला विसरू नये यावर महाराजांनी एका सेवानिवृत्त मनुष्याचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, तो मनुष्य नोकरीला होता तेव्हा सत्संग करता आला नाही. मुला-मुलींचे लग्न झाले. संसारात गुंतल्याने परमार्थ करता आला नाही आणि आता निवृत्त झाल्याने परमार्थ करावा असे वाटले म्हणून ध्यानाला बसला. ध्यानाला बसल्यावर त्याला भगवंताचे ध्यान, चिंतन घडत नाही. मग तो एका महात्म्याकडे गेला व खंत बोलवून दाखविली. त्या महात्म्याने सांगितले की, तू सात दिवसात मरणार आहेस. तो घाबरला घरी गेला.

बायका मुलांना महात्म्याने बोललेले सांगितले. महात्म्याचे बोलणे खोटे ठरत नाही. त्यामुळे सर्व रडायला लागले. दोन दिवस रडले, तिसर्‍या दिवशी मुले कामधंद्याला गेली. मुलीही सासरी गेल्या. भगवंताशिवाय पर्याय नाही. संपत्ती वाटून द्यायचे ठरवितो. मुले म्हणाली, तुमचे दोन दिवस राहिले आम्हाला तुमच्या डोळ्यादेखत संपत्तीच्या वाटण्या करून द्या. वाटून दिले, पत्नीच्या खात्यावर पैसे टाकले. सहावा दिवस उगवला. जवळ काहीच ठेवले नाही. जे होते ते दानधर्म करून टाकले. दोन दिवस आश्रमात घालवायचे ठरविले. तो आश्रमात जाऊन बसला. 7 व्या दिवशी रात्री 10 वाजता मृत्यू होणार हे सांगितले होते. जसजशी वेळ जवळ आली तसा तो अस्वस्थ झाला. भगवंताच्या चिंतनात गुंतला.

चिंतनात वेळ कसा गेला कळले नाही. दोन तास जास्त झाले. महात्म्याकडे गेला. दोन तास जास्त झाले. मला मृत्यू आला नाही. महात्मा म्हणाले, प्रत्येक मनुष्य 7 दिवसांतच मरतो. आठवड्याला सातच दिवस असतात. तू सात दिवसातच मरणार आहेस. दान धर्म केला, मृत्यूचे स्मरण करतो, तोच पुण्य करतो. म्हणून मृत्यूला विसरू नये.

जगातील सर्व वस्तू भयाला कारण आहेत. मग अभयाला कारण आहे वैराग्य! जगामध्ये वैराग्याशिवाय अभय प्राप्त करू शकत नाही. ते वैराग्य अध्यात्मातील ज्ञानातून प्राप्त होते. वैराग्य दैवी संपत्ती आहे. वैराग्याबद्दल अधिक माहिती सांगताना महंत रामगिरी महाराज यांनी शुक्राचार्य यांचेवरील प्रसंग सांगितला. शुक्राचार्य ध्यानस्थ बसले होते. देवांगना रंभा आली. ध्यान भ्रष्ट करण्यासाठी आली.

तिने प्रयत्न केला परंतु शक्राचार्यांचे ध्यान हे परमात्म्याचे असते. ते परमात्म्याशी एकाग्र होते. रंंभा सौंदर्यीक वर्णन केले. तरीही ते व्यर्थ होते. हे वैराग्य आहे. जिथे वैराग्य आहे तेथे अभय आहे. संसारात अनेक ठिकाणी भय आहे. वैराग्य निर्माण होण्यासाठी जिज्ञासा पाहिजे. जिज्ञासा एक वृत्ती आहे. विवेक युक्त वैराग्य निर्माण व्हावे. विवेक वैराग्य निर्माण झाल्याशिवाय अभय निर्माण होऊ शकत नाही. सात्विक व्यक्तीमध्ये हे गुण असतात.

संसारात भय आहे, जो पाप कर्म करतो तो भयभित होत असतो. अनाचारी, अत्याचारी भयग्रस्त असतात. रावणाने त्रैलोक्यांवर विजय मिळविला, त्याला काय कमी होते. सात कोटी सोन्याची घरे होती. तो सितेचे अपहरण करण्यास गेला, तो लक्ष्मणाने बाणाने निर्माण केलेली लक्ष्मण रेषा ओलांडू शकला नाही. संपूर्ण विश्वावर विजय मिळविला तरीही लक्ष्मण रेषा ओलांडण्याचे भय होते. ज्यावेळी मनुष्य कुकर्म करतो, चुका करतो तो त्यावेळी भयभित होत असतो.

संसारात दु:ख भरलेले आहे. महाभारतातील कौरव पांडव युध्दाचा प्रसंग महंत रामगिरी महाराज यांनी प्रत्यक्ष उभा केला. कौरवांचे सैन्य 11 अक्षरी तर पांडवांचे 7 अक्षरी होते. पांडवांचा शंख वाजला तेव्हा कौरवांच्या छातीत भय निर्माण झाले. मात्र कौरवांचा शंख वाजला तेव्हा पांडवांवर काहीही परिणाम झाला नाही. हा प्रसंग विस्ताराने सांगत महाराज म्हणाले, सत्य वागणाराकडे आत्मबल असते. असत्य वागणारा मनुष्य कितीही मोठा असला तरी तो भयभित होतो.

धन आणि भय

पैशावाल्याला चोरांचे भय असते. पोरांचे, इनकमटॅक्स वाल्यांचे भय असते. साधू संतांनी धनाला महत्त्व दिलेले नाही. धनाचे संसारात महत्व, संतांचा धनाला विरोध नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त धन असेल तर त्याचा सदुपयोग करावा. परोपकाराकरिता करा, भोगाकरिता केला तर नाश होतो. धन आणि मन जास्त झाले की शत्रू निर्माण होतात. धनाला अनेक वैरी असतात. अविश्वास खूप निर्माण होतो. स्पर्धा हा एक दोष आहे, कारण धनवान हा स्पर्धेत असतो. त्याला मोठे होण्याची हौस असते. मनुष्याने कोठेतरी थांबले पाहिजे. धनवान थांबत नसतो. म्हणून त्याच्यात तृष्णा खूप असते.

ज्यात तृष्णा असते जो असंतुष्ट आहे तो दरिद्री! वारकरी हे धनवान आहेत कारण परमार्थ हे महाधन आहे. हे महाधन देवाची प्राप्ती करून देते. ज्याच्याजवळ रामनाम रुपी धन आहे तो खरा धनवान आहे. बाकी सर्व निर्धन आहेत. शब्दरुपी धन, रत्न, शास्त्र आहे. परमात्माला प्राप्त करणारे खरे धनवान आहेत. ज्या धनाने परमेश्वराची प्राप्ती होते ते खरे धन. पैसारुपी धन असलेल्या मनुष्यात लंपटपणा, व्यसनाधिनता असते.

अतिसंपत्ती ही विपत्तीचे दुसरे रुप आहे. अतिसंपत्ती असणारा मनुष्य सुखी नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी आपले द्रव्य वाटून दिले. संसारातून मुक्त झाले, त्यामुळे त्यांना भजन करण्यास वेळ खूप मिळाला. प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूलता कशी निर्माण करावी हे संत चरित्रातून शिकावे. कर्तृत्वाला मान सन्मान मिळतो, त्याला भीती नाही.

जरासंध आणि पन्नाशी !

बल आल्यानंतर बलवान उन्मत्त होतात, शत्रू वाढवितात. जरासंधाचा प्रसंग महाराजांनी वर्णन केला. जरासंधाने भगवान कृष्णाचे शत्रुत्व ओढावून घेतले. जरा म्हणजे व्याधी अणि संध म्हणजे संच, म्हणजेच व्याधींचा संच! श्रीमद भागवताच्या दशमस्कंधात 50 व्या अध्यायात जरासंध आला. 50 च्या पुढे व्याधींचा संच! पन्नाशीत गुडघा दुखी, बीपी, शुगर, कमरेला, मानेला पट्टा, पन्नाशी ओलांडल्यानंतर जरासंधाचा जोर वाढतो. जरासंधाला भगवंताला मारावे लागले. भिमाकडून हे काम करून घेतले. पांडवांच्या राजसी यज्ञाचा प्रसंग वर्णन करत महंत रामगिरी महाराजांनी जरासंधाच्या वधाचा प्रसंग आपल्या सुश्राव्य वाणीतून जिवंत केला.

Deshdoot
www.deshdoot.com