गंगागिरी महाराज सप्ताहाची पुणतांब्यात औपचारिक घोषणा
सार्वमत

गंगागिरी महाराज सप्ताहाची पुणतांब्यात औपचारिक घोषणा

करोनामुळे सराला बेटावर मोजक्या भाविकांत सप्ताह : रामगिरी

Arvind Arkhade

पुणतांबा|वार्ताहर|Puntamba

भाविकामंध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून सद्गरू योगीराज गंगागिरी महाराज यांनी 172 वर्षापूर्वी सुरू केलेली अखंड हरिनाम सप्ताहाची अलौकिक पंरपरा यापुढेही चालू राहावी म्हणून 173 वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे करोनाचे संकट असल्याने 50 भाविकांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमांचे पालन करून श्रीक्षेत्र सराला बेट येथे होणार असल्याची औपचारिक घोषणा सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी पुणतांबा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

यावेळी सप्ताह समितीचे अध्यक्ष तथा वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, कडूभाऊ काळे, बाळासाहेब कापसे, कमलाकर कोते, बाबासाहेब चिडे, संदीप पारख, संतोष जाधव, किशोर थोरात, मधुकर महाराज, सरपंच डॉ.धनंजय धनवटे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, डॉ. विजय कोते, राजेंद्र गायकवाड, दत्तू खपके, बाळासाहेब महाराज रंजाळे, गणेश महाराज शास्त्री, सुभाषराव वहाडणे, दिनकरराव भोरकडे, विजय धनवटे, मनोज गुजराथी, प्रा. डॉ. एस. आर. बखळे, बाळासाहेब सांबारे, भास्कर गुरु चव्हाण, प्रताप वहाडणे, बंडू साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

रामगिरी महाराज म्हणाले, सध्याच्या करोना महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्ताहाच्या काळात चार प्रहाराच्या काळात किमान 8 ते 10 हजार टाळकरी मंडळी असतात व दररोज प्रवचनाच्या काळात लाखो भाविक हजेरी लावतात. करोनामुळे एवढी मोठी गर्दी एका ठिकाणी गोळा होणे सर्वांनाच हानिकारक आहे. त्यामुळे करोनाच्या संकटाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. म्हणून शासनाने लॉकडाऊनच्या जाहीर केलेल्या नियमांच्या अधिन राहून तसेच 172 वर्षांची परपंरा खंडित होऊ नये म्हणून सराला बेटाच्या ठिकाणी सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या अध्यक्षतेखाली सप्ताह समिती स्थापन करण्यात आली आहे. यावर्षी भाविकांनी सप्ताहासाठी बेटावर न येता घरी राहून मनाने सप्ताहात सहभागी व्हावे, मानस सप्ताह म्हणून या सप्ताहाकडे बघावे, सप्ताहाचे दररोज दूरचित्रवाहिनी, गुगल यू ट्यूब तसेच स्थानिक चॅनेलमार्फत प्रक्षेपण केले जाणार आहे.

सप्ताह काळात सराला बेटाकडे येणार्‍या प्रत्येक रस्त्यावर पोलीस बंदोबस्त राहणार असून भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी घरीच थांबावे. अवघ्या 50 भाविकांच्या उपस्थितीत नियमांचे पालन करून सप्ताह काळात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविकांना ऑनलाईन पध्दतीने देणगी देता येईल, त्यासाठी बँकेत स्वंतत्र खाते उघडण्यात येणार आहे.

प्रास्ताविक दिनकरराव भोरकडे यांनी केले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे, सुभाषराव वहाडणे, विजय धनवटे यांनी मनोगत व्यक्त करून सप्ताहाला संपूर्ण सहकार्य करण्याचे जाहीर केले. सप्ताह समितीचे अध्यक्ष आमदार रमेश बोरनारे यांनीही मनोगत व्यक्त करून महंतांच्या आशिर्वादाने व भाविकांच्या सहकार्याने सप्ताह चांगल्या पध्दतीने पार पाडू, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते 173 व्या सप्ताहाचा नारळ सप्ताह समितीचे अध्यक्ष आ. बोरनारे व त्यांच्या सदस्यांकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आला. कामिका एकादशीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे सप्ताहाची घोषणा करून नारळ देण्याची परंपरा महाराजांनी चालू ठेवल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.

पुणतांब्यात शुकशुकाट

श्रीक्षेत्र पुणतांबा येथे काल आषाढ महिन्यातील कामिका एकादशीची यात्रा करोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली असल्यामुळे संपूर्ण दिवसभर भाविकांचा शुकशुकाट दिसून आला.

काल सकाळी पाच वाजता योगीराज चांगदेव महाराजांच्या समाधी व मूर्तीला देवस्थानचे विश्वस्त महेश मुरुदगण व सदस्यांनी विधिवत अभिषेक करून पूजा केली. काल येथील विठ्ठल घाटावर तीन दशक्रियाविधी असल्यामुळे स्थानिक व बाहेरच्या ग्रामस्थांनी नदीवर गर्दी केली होती. गंगास्नान करून व विधी आटोपल्यानंतर भाविक दूर अंतरावरूनच देवळाचे दर्शन घेऊन मार्गस्थ होताना दिसत होते.

दुपारी 1 वाजेच्या दरम्यान देवस्थानचे विश्वस्त महेश मुरुदगण व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस यांच्यात योगीराज चांगदेव महाराजांची प्रतिमा असलेला फोटो बाहेर ठेवण्यावरून शाब्दिक चकमक झाली. फोटोमुळे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात तर समाधी मंदिरापासून 500 फूट अंतरावर छोट्या बाकावर फोटो ठेवला आहे. भाविक श्रध्देने गर्दी न करता नमस्कार करून जातात, असे श्री. मुरुदगण यांचे म्हणणे होते. काहींनी मध्यस्ती करून यावर पडदा टाकला. पोलीस बंदोबस्तामुळे मंदिर परिसरात एकही दुकान थाटण्यात आले नव्हते. त्यामुळे परिसर मोकळा दिसत होता. करोनामुळे बाहेरचे पायी दिंडीने येणारे भाविक नव्हते. तसेच मंदिराकडे येणार्‍या वाहनांच्या रांगाही नव्हत्या. असे चित्र 35 वर्षांत प्रथमच दिसले, असे देवस्थानच्या विश्वस्तांनी स्पष्ट केले.

येत्या रविवारी दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता सराला बेटावर सप्ताहाचा ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सप्ताह समितीच्या मोजक्याच सदस्यांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com