सराला बेटावर 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण

महंत रामगिरी महाराज व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते पार पडला सोहळा
सराला बेटावर 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण

अस्तगाव|वार्ताहर|Astgaon

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेटावर येत्या 24 जुलै ते 31 जुलै दरम्यान पार पडणार्‍या सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण साध्या पध्दतीने, अवघ्या 50 जणांच्या उपस्थितीत, सोशल डिस्टन्सिंग पाळून महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. वरुण राजाच्या साक्षीने निसर्गरम्य सराला बेटावर हा सोहळा पार पडला.

वरुण राजाची सारखी रिपरिप, अधूनमधून उघडीप, गोदावरीने चारही बाजूने स्पर्शुन जाताना तिच्या पात्रात हलकासा झुळझूळ वाहणारा प्रवाह, मंदिरावरील उंचच उंच भगवा ध्वज फडकत व मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत या पवित्र तिर्थक्षेत्री सराला बेटावर करोनाच्या पार्श्वभूमीवर सप्ताहाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा 173 वा अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण पार पडला. नेहमीच्या सप्ताहाच्या प्रथेप्रमाणेच हा ध्वज उंच हवेत दिमाखात फडकला गेला.

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरणारे, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, वंदना मुरकुटे, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, बाबासाहेब चिडे, तुकाराम गोंदकर, कमलाकर कोते, संदीप पारेख, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, गंगापूरचे संतोष जाधव, सुभाषराव गमे, मधुकर महाराज, चंद्रकांत महाराज सावंत, नवनाथ महाराज आंधळे, दत्ता खपके आदी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी खा. सदाशिव लोखंडे, अशोकचे संचालक बबनराव मुठे, नितीनराव कापसे, सागर कापसे, अण्ण्णासाहेब निरगुडे, राजेंद्र साळुंके, सुरेश गलांडे, पोपटराव जाधव, बाबासाहेब काळे आदींनी भेट दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर बेटावर भाविकांना येण्यास मज्जाव केलेला होता. सप्ताह काळातही अवघ्या 50 जणांच्या उपस्थितीत हा सप्ताह पार पडणार असल्याने भाविकांना सप्ताह स्थळी येता येणार नाही.

सप्ताहाच्या ध्वजारोहणाला एरवी किमान 30 ते 40 हजार भाविक उपस्थित असतात. मोठ्या आकाराचा प्रहारा मंडप असतो. तो खच्चून भाविकांनी भरलेला असतो. त्यापुढे सप्ताहाचा ध्वज उभारलेला असतो. त्यांचे ब्रम्हवृंदांच्या मंत्रोपच्चारात पूजन केले जाते. या मंगलमय आणि दिमाखदार सोहळ्याला गर्दी होत असते. त्यानंतर महंत रामगिरी महाराज भाविकांना मार्गदर्शन करत सप्ताहाचा उद्देश सांगतात.

परंतु काल करोनाच्या पार्श्वभूमीवर काही भाविक भक्त सोडले तर गर्दी करण्यास मनाई असल्याने या सोहळ्याला मर्यादित लोक उपस्थित होते. प्रशासन, पोलीस यंत्रणा उपस्थित होती. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचे स्पे्र दिसून येत होते. करोनामुळे सप्ताहाची परंपरा खंडित होते की काय? असा प्रश्न भाविकांमध्ये होता. परंतु महंत रामगिरी महाराज व सप्ताह समितीने चांगला निर्णय घेतल्याने भाविकांत समाधान आहे.

कोणत्याही भाविकांनी बेटावर येऊ नये. घरीच राहून सप्ताहाचा आनंद घ्यावा. यासाठी टीव्ही, मोबाईलवर व सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर थेट प्रक्षेपण करण्यात येईल. वृत्तपत्रात बातम्या येतील तशी सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रशासनच्यावतीने गोदावरी नदीच्या पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.त्यामुळे या बेटावर कुणीही येऊ नये, असे आवाहन महंत रामगिरी महाराजांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com