सर्व पापांचे प्रायश्चित्त म्हणजे नामस्मरण : महंत रामगिरी महाराज
सार्वमत

सर्व पापांचे प्रायश्चित्त म्हणजे नामस्मरण : महंत रामगिरी महाराज

सदगुरु गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताह

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रायश्चित्त कर्म सांगितले आहे. सर्वात सोपे आणि श्रेष्ठ प्रायश्चित्त म्हणजे नामस्मरण! इतर प्रायश्चित्तामुळे काही पापे नष्ट होत असतील पण नामस्मरण प्रायश्चित्तामुळे सर्व पापे नष्ट होतात, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले.

योगिराज सदगुरू गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवसाच्या चौथ्या पुष्पात महंत रामगिरीजी महाराज यांनी दैनिक सार्वमतशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधताना दोष, व्यसने, कर्म यावर बोट ठेवले.

अभयम, भयाचा अभाव, ज्या ठिकाण् भय नाही, भयाची अनेक कारणे पाहिली, भय कुणाला नाही, जो भगवंताचे भजन करतो, त्याला भय नाही, निर्भय होऊन आम्ही भजन करतो, निर्लज्ज होऊन भजन करतो आम्ही, लाजणारांना भजनाचा आनंद नाही, मिराबाई लाजली का हो? हसत हसत विष प्राशन केले. तरीही तिला काही झाले नाही. सर्व जग विरोधात जाऊ द्या, फक्त परमात्मा आपल्या बरोबर पाहिजे. पांडवांच्या बरोबर भगवंंत होते! 11 अक्षयनी सेना कौरवांकडे तर 7 अक्षयनी सेना पांडवांकडे होती.

परमात्मा पांडवांकडे, परमात्मा आपल्याकडे असल्यावर जगात दु:ख कुणीही देऊ शकत नाही. दु:खात दु:ख देण्याचे सामर्थ्य राहत नाही, त्याला अभय म्हणतात. अंत:करणाची सम्यक शुध्दी, पूर्ण अंत:करणाची शुध्दी अंत:करणातील दोष ज्याचे राहत नाही! या संसाराशी अनासक्त वृत्तीने संसारात राहायचे, द्रष्टा म्हण्ाून राहायचे आहे. संसाराला चिकटला म्हणजे दु:ख. यावर महाराजांनी एक प्रसंग सांंगितला. भगवंत दत्तात्रयांच्या 24 गुरुंमध्ये एक सेन नावाचा पक्षी होता. या सेन पक्षाला भगवंत दत्तात्रयाने गुरू मानले.

त्यात काय विशेष होते? असा कोणता गुण सेन पक्षात दत्तात्रयांना दिसला, हा सेन पक्षी उडत असताना त्याच्या तोंडात मांसाचा तुकडा होता. त्याच्या पाठीमागे अनेक पक्षी लागले, झोंबू लागले, सेन पक्षाच्या लक्षात आले, ते पक्षी मांसासाठी मागे लागले, मग त्याने चोचितील मांसाचा तुकडा सोडून दिला, जमिनीवर टाकला! सर्व पक्षी जमिनीच्या दिशेने खाली गेले. भांडण करू लागले, हे द्रष्टा म्हणून सेन पक्षी पहात होता, मांसाचा तुकडा हा दु:खाचे कारण होते.

जोपर्यंत त्या मांसाच्या तुकड्याला माझा म्हणत होतो, तोपर्यंत ते पक्षी माझ्या मागे लागले होते. तो तुकडा सोडून दिल्यानंतर दु:ख संपले! तसे या संसारात जी आसक्ती आली की, दुःख आले. म्हणून अनासक्त वृत्तीनेे भगवंताच्या अनुरागातून जर जीवन व्यतीत करत असेल, अशा प्रकारचे जीवन म्हणजेच सत्य संशुध्दी! शुध्द अंत:करणाशिवाय त्याग होऊ शकत नाही, शुध्द अंत:करणाशिवाय भगवंत प्राप्त होऊ शकत नाही. अंत:करणात अनेक प्रकारचे दोष आहेत.

वेदांत शास्त्रात तीन प्रकारचे दोष मानलेले आहेत. मल, विक्षेप, आणि आवरण! मल दोष नष्ट करण्याकरिता कर्म मार्ग सांगितला आहे. विक्षेप दोष नष्ट करण्यासाठी उपासना मार्ग सांगितला, आणि आवरण दोष दूर करण्यासाठी ज्ञान मार्ग सांगितला. वेदात 80 टक्के कर्मकांड आहे, 16 टक्के उपासना आहे आणि ज्ञान फक्त 4 टक्के आहे. कर्माचा एवढा विस्तार का केला? कर्म कशा करिता, मलिनता नष्ट करण्यासाठी निष्काम कर्म आहे.

मग विहीत कर्म हे करायला सांगितले आणि करू नका म्हणून सांगितलेले निशिध्द कर्म. निशिध्द कर्म हे अधोगतीला नेणारे आहे, म्हणून करू नका, विहीत कर्माचे चार भाग आहेत, तर निशिध्द कर्म म्हणजे करू नये ते कर्म, जे करू नये ते करणार म्हणजेच वाईट कर्म, संसारात व्यसनाधिन लोक फार आहेत. व्यसन वाईट आहे. संसार हेच व्यसन आहे. संसाराला अनावश्यक मानलेले आहे.

सात प्रकारचे व्यसने सांगितले आहेत. द्युत म्हणजे जुगार, वाईट आहे. जर जीवन व्यर्थ घालवायचे असेल तर खुशाल व्यसने करा, कर्माची फळे वाईट असतात, ते धर्मराजालाही, नळ राजाला द्युत खेळण्याचे परिणाम भोगावे लागले. धर्मराजाला परिणाम भोगावे लागले. राज्य गेले, आणि शेवटच्या डावात द्रौपदीला डावावर लावावे लागले. आणि धर्मराज त्या ठिकाणी सुध्दा हरले. त्याचा परिणाम द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. धर्मराजा खाली मान घालून बसले, पत्नीला कुणी भरसभेत विवस्त्र करते तेही डोळ्यासमोर हे वाईट आहे.

कुणी विरोध करत नाही, आपणही करू शकत नाही, द्युत खेळल्याचे परिणाम! जीवनात थोड्या चुकांमुळे किती वाईट परिणाम होतात. धर्मराजाच्या संचित कर्माचे फळ, दु:शासन द्रौपदीचे वस्त्र ओढीत होता, द्रौपदी मोठ्या आशेने वडीलधारी मंडळी भिष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत होती.

ते सर्व मान खाली घालून बसले, लज्जास्पद घटना आहे. शेवटी द्रौपदीला स्वत:च्या बळावर विश्वास होता, तिने सुटण्याचा प्रयत्न केला, परंतु ती कमी पडली, शेवटी भगवंताचा धावा तिने केला. सर्व आशा तुटतात तेव्हा भगवंताची आठवण येते, भगवंत आले, भगवंतानेच वस्त्र अवतार धारण केला. सर्व आश्रयांच्या आशा तुटल्यानंतर भगवंत धावून आले. द्युतांचे परिणाम पांडवाना भोगावे लागले, पांडवांना राज्य गमवावे लागले, वनात जावे लागले.

मांस हा मनुष्य प्राण्याचा आहार नाही. हौसेने मांस खातो पण ज्याचे मांस खाल्ले तो प्राणी वैरी होतो. कधीतरी तो तुला खाणारच, मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांतील फरक स्पष्ट करत महाराज म्हणाले, शाकाहार घेतल्याने शरिरातील उर्जा वाढते तर मांसाहारामुळे शरिरात उर्जा वाढत नाही. मांसाहार हा निषिध्द आहे. मदिरा (दारू) या व्यसनामुळे जठराग्नी खराब होतो. अल्कोहोल आरोग्यास घातक आहे.

जीवन बर्बाद होते. काहींना त्याचे भूषण वाटते, विषय भोगतो, म्हणजे भोगाने तुला भोगले, तसे तू दारू पिला नाही, दारूने तुला पिऊन टाकले. शिकार करण्या बद्दल बोलताना महाराज म्हणाले, पूर्वी हौशेसाठी शिकार करायचे, त्यामुळे अनेक जीव जाती संपल्या गेल्या, माणसाला असे वाटते पृथ्वीवरील वस्तू माझ्या भोगासाठीच आहेत. शिकार हा दोषच आहे. देशात हजारो कत्तलखाने आहेत गायी कापल्या जातात, वाईट वाटते, यातना देऊन मांस भक्षण करत असाल तर ते पाप, ते भोगावे लागते.

चौर्यम म्हणजे चोरी, हव्यासासाठी दुसर्‍याचे धन हडप करणे म्हणजे चोरी, चोरी करणे अपराध आहे. दुसर्‍याचे धन काढणे, ते धन नसून विष असते. परस्त्रीगमन (परदारागमन) याचे उदाहरण देताना पुरणातील नवश्या राजाचे उदाहरण त्यांनी दिले. परस्त्री गमनाचे फळ त्याला मिळाले, रावण, दुर्योधनाची काय अवस्था झाली, कौरव कुळाचा नाश झाला. ही सर्व व्यसने आहेत. अतिघोर जिवाला नरकात घालणारी ही व्यसने आहेत. त्याला निषिध्द कर्म म्हणावे लागेल.

विहीत कर्माचे चार भाग आहेत. नित्यकर्म त्यातील एक, नित्य कर्मात त्रिकाल आहे ना, त्यात संध्या केली जाते. या तीन कालाच्या अवस्था या अवस्थेत मन कमजोर झालेले असते. मनात विकार येतात. म्हणून मन रिकामे ठेवायचे नाही, या काळात भगवंताच्या भजनात रमवा, म्हणजेच संध्या करायची असते. कुकर्मापासून आपण वाचतोय, पुण्य मिळो अथवा न मिळो, पण पाप झाले नाही. तीन प्रकारच्या तीन संध्या सांगितल्या आहेत. प्रात संध्या, मध्यान्ह संध्या, आणि सायंसंध्या, या संध्याचा संबंध सूर्य चंद्राशी आहे.

चंद्र मनाचा तर सूर्य बुध्दीचा स्वामी आहे. चंद्राचा द्रव पदार्थाशी जवळचा संबंध आहे. म्हणूनच समुद्राला भरती ओहोटी येते ती चंद्रामुळे, चंद्राचा संपूर्ण जलावर परिणाम होत असतो. आपल्या शरिरात जलधातू आहे. म्हणून चंद्राचा शरिरावरही परिणाम होतो आणि मनावरही परिणाम होतो. काही लोक अमावस्या पौर्णिमेला बिघडतात, कारण त्यांची बुध्दी कमजोर झालेली असते. कोजागरीला रात्री दूध आळवतो, चंद्राच्या प्रकाशातून अमृताचा स्त्राव होत असतो. झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रायश्चित्त कर्म सांगितले आहे.

सर्वात सोपे आणि श्रेष्ठ प्रायश्चित्त म्हणजे नामस्मरण, इतर प्रायश्चित्त काही पापे नष्ट होत असतील पण नामस्मरण प्रायश्चित्ताने सर्व पापे नष्ट होतात. अंत:करणाचे शुध्दीकरण करण्यासाठी कर्म सांगितले आहेत. निषिध्द करण्याची प्रवृत्ती, वाईट कर्म करण्याची प्रवृत्ती जोपर्यंत चित्तात मलिनता आहे, तोपर्यंत असते. उपासना मार्गाद्वारे चित्ताचे शुध्दीकरण होते, असेही रामगिरी महाराज यावेळी म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com