सदगुरू गंगागिरी महाराज व साईबाबा भेटीची स्मृती जतन

घटनाक्रमांची स्मृती युगानयुगे जपणारी कालकुपी सराला बेटवर स्थापीत
सदगुरू गंगागिरी महाराज व साईबाबा भेटीची स्मृती जतन

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सदगुरू गंगागिरी महाराज व साईबाबा यांची भेट शिर्डीत झाली. पांडुरंगाच्या कृपेने साई समाधी शताब्दी निमित्त तेथे ऐतिहासिक हरिनाम सप्ताह संपन्न झाला.

त्यातील उरलेल्या निधीतून सराला बेटावर प्रशस्त धर्मशाळा उभी राहिली. या सर्व घटनाक्रमांची स्मृती युगानुयुगे जपणारी कालकुपी आज सराला बेटावरील भुमीत स्थापीत झाली. ही एक अलौकीक घटना आहे, असे प्रतिपादन सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केले.

सदगुरू गंगागिरी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सराला बेटावर उभारलेल्या साई समाधी शताब्दी धर्मशाळेच्या आवारात त्यांच्याहस्ते ही कालकुपी भुगर्भात स्थापीत करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. मधुकर महाराज कडलग, साई समाधी शताब्दी हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष तुकाराम गोंदकर, विश्वस्त कमलाकर कोते, संदीप पारख, राहूल गोंदकर, ईश्वरसिंग पाटील, सुनील बारहाते, महेश महाले, चंद्रकांत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

महंत रामगिरी महाराज म्हणाले, या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या हरिनाम सप्ताहाचा जमाखर्च कोरलेला रौप्यपट, त्या निमित्ताने काढण्यात आलेली चांदीची नाणी, सध्या व्यवहारात प्रचलित असलेली नाणी या वस्तू पुढील हजारो वर्षे शिर्डी व सराला बेट यांचा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम करतील.

हरिनाम सप्ताह समितीचे अध्यक्ष तुकाराम गोंदकर म्हणाले, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्यासह शिर्डी ग्रामस्थांचे या कालकुपीसाठी मोलाचे सहकार्य मिळाले.हरिनाम सप्ताहाची आठवण कायम ठेवण्यासाठी येथे धर्मशाळेची सुसज्ज इमारत उभी राहिली. याचे शिर्डीकरांना मोठे समाधान वाटत आहे. विश्वस्त कमलाकर कोते यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते कालकुपी भुगर्भात स्थापीत करण्यात आली. सराला बेटाचे महंत वैराग्यमूर्ती गंगागिरी महाराज व शिर्डीचे साईबाबा यांच्या स्मृती चिरंतन जपण्याचे काम ही कालकुपी करणार आहे.

- तुकाराम गोंदकर, अध्यक्ष, शिर्डी हरिनाम सप्ताह समिती

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com