श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

राहाता तालुक्यातील वाकडी शिवारात गोटेवाडी रोडवर, पाटाच्या कडेला, हाडोळा शिवारात एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला संशयितरित्या

दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना काल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून हत्यार, चोरीचे दोन वाहने तसेच अन्य ऐवज पोलिसांनी ताब्यात घेत दोघांना पकडले. यावेळी चार जण पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाले. याप्रकरणी सात जणांविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबर्याकडून बातमी मिळाली कि, सराईत गुन्हेगार शुभम काळे, रा. गणेशनगर, राहाता हा त्याचे साथीदारांसह वाकडी, ता. राहाता शिवारात गोटेवाडी रोडवर पाटाचे कडेला एका पत्र्याचे शेडच्या आडोश्याला दरोडा घालण्याच्या तयारीने थांबलेले आहेत.

त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस नाईक संतोष लोटे, शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वाघ, संदिप दरंदले, विनोद मासाळकर, राहुल सोळंके, रोहित मिसाळ, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर या पथकास कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. पथकातील पोलीसांनी मिळालेल्या बातमीनुसार पंचासह वाकडी येथे जावून वाकडी ते गोटेवाडीकडे जाणारे रोडवर पाटाचे कडेला सापळा लावला. त्यावेळी तेथे आंधारात पत्राचे शेडचे आडोश्याला 5 ते 6 इसम त्यांचेकडील मोटार सायकल उभ्या करुन आपसात काहीतरी कुजबुज करीत असल्याचे दिसले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांची खात्री पटल्याने सर्वांनी घेराव घालून छापा टाकला. यावेळी त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागल्याने ते त्यांची वाहने जागीच सोडून पळून जावू लागले. त्यावेळी पथकातील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन दोन जणांना ताब्यात घेतले.

तर चार जण अंधाराचा फायदा घेवून पळुन जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या दोघांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे पत्ते विचारली असता, शुभम अनिल काळे (वय-21) रा. गणेशनगर, ता. राहाता, भरत ऊर्फ भर्या तात्याजी काळे, (वय- 22), रा. सप्तश्रृंगी मंदीरा शेजारी, गणेशनगर ता. राहाता असे सांगितले. पळून गेलेल्या साथीदाराबाबत चौकशी केली असता आनंद अनिल काळे, रा. गणेशनगर, ता. राहाता, अक्षय यशवंत आव्हाड, रा. गणेशनगर, ता. राहाता, गणेश भिकाजी तेलोरे, रा. गणेशनगर, ता. राहाता व राहुल वाघमारे, रा. रांजणगाव ता. राहाता अशी असल्याचे सांगीतले. पकडलेल्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडेे एक विना क्रमांकाची रॉयल इनफिल्ड कंपनीची क्लासिक बुलेट, एक विना क्रमांकाची बजाज कंपनीची 220 सीसी पल्सर मोटार सायकल, एक तलवार, एक गलोल, एक मोबाईल, मिरची पुड असा एकूण 71,500/-रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. तो जप्त करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक संतोष शंकर लोढे, यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुरनं. 154/2021, भादवि कलम 399, 402 सह आर्म अॅक्ट कलम 4/25 प्रमाणे दाखल करण्यात येवून पुढील कार्यवाहीसाठी श्रीरामपूर तालूका पोलीस स्टेशनला वर्ग केला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक़ मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक़ सौरभ कूमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी केली.