
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi
गणेशवाडी येथील डौलै वस्ती येथे 22 जानेवारीच्या रात्री हातात बेडी घालून जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा तपास 15 दिवसातही लागला नसून तपास लागेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
किशोर नारायण डौलै यांच्या हातात बेडी घालून चोरीचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारची चोरी पहिल्यांदाच झाली आहे. सदर बेडी कुठल्या पोलीस ठाण्याची आहे याचा खोलात जाऊन तपास केल्यास या घटने मागील खरे कारण समोर येईल. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र पंधरा दिवस उलटत आले तरी सदर बेडी कुठली याचा तपास देखील लागता लागेना. त्यामुळे तपास लागेल की नाही? अशी शंका निर्माण होत आहे.
यापूर्वीच्या अनेक चोर्यांचा तपास प्रलंबित आहे. त्यात घोडेगाव सोने प्रकरण पोलिसांनी कशाप्रकारे हाताळले हे सर्वांना माहीत आहे. यातील आरोपीने सराफास सोने विकल्याचे सांगितले मात्र पोलिसांनी या गुन्ह्यातील काही सोनेच फक्त जप्त करण्यात धन्यता मानली. सराफाला आरोपी करणे आवश्यक असताना त्याला ‘क्लिनचीट’ देण्यात आली. त्यामुळे या सर्व प्रकरणांचा तपास योग्य पद्धतीने होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गणेशवाडी येथील चोरीच्या प्रयत्नाच्या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले आहे. तरी अद्याप तपास लागलेला नसल्याने ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना निवेदन देणार आहोत.
- कैलासराव दरंदले, सरपंच, गणेशवाडी