यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा
सार्वमत

यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा

जिल्हा पोलिसांकडून नियमावली जाहीर

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचं संकट असल्यामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता जिल्हा पोलीस दलाने खबरदारी घेतली आहे. गणेशोत्सव व बकरी ईद अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यासाठी शासनाने केलेल्या सूचनांना अनुसरून जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी नियमावली जाहीर केली आहे. उत्सव काळात जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत.

श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी 4 फूट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटाच्या मर्यादित असावी. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. महापालिका, स्थानिक प्रशासनाची यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे, स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

उत्सवासाठी देणगी, वर्गणी स्वेच्छेने दिलास त्याचा स्वीकार करावा. आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. गणपती मंडप निर्जंतुकीकरण करावे, तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनिटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीतजास्त व्यवस्था करण्यात यावी. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

करोना संसर्गजन्य परस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्व धार्मिक कार्यक्रमांस बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार बकरी ईदची नमाज मशीद अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता घरीच साजरी करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी केले आहे. सध्या जनावरांचे बाजार बंद असल्याने ऑनलाईन किंवा फोनद्वारे जनावरे खरेदी होत आहेत. यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लागू केलेले निर्बंध कायम राहतील,यामध्ये बकरी ईद निमिर्ती कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. बकरी ईद निमित्त नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व कोविड-19 नियमावलीचे पालन करावे असे अधीक्षक सिंह यांनी सांगितले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com