ऐन गणेशोत्सवात शिर्डीत फिरती मांस विक्री; एकास अटक

ऐन गणेशोत्सवात शिर्डीत फिरती मांस विक्री; एकास अटक

शिर्डी (प्रतिनिधी)

ऐन गणेशोत्सव काळात शिर्डी शहरातील श्रीरामनगर, पूनमनगर भागात दुचाकीवरून गोमांस विक्री करणाऱ्या संशयित इसमास एका महिलेने जीवाची पर्वा न करता पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपीस अटक केली असून त्याच्या ताब्यातील मांस जप्त केले आहे.

शिर्डी शहरातील श्रीरामनगर भागात ठिकठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. या भागात काही घरामध्ये दुचाकीवरुन एक इसम गोमांस पार्सल करून विक्री करत असल्याचा संशय याच भागात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या दिपाली पवार यांना आला. त्यांनी सदर इसमाचा पाठलाग करून मांस विक्री करताना रंगेहात पकडले. याची खबर त्यांनी पोलिसाना दिली.

पोलीस येईपर्यंत सदर इसमास त्यांनी पकडून ठेवले. त्यावेळी सदर इसमाने स्वतःची सुटका करण्यासाठी दिपाली पवार यांना धमक्याही दिल्या. मात्र त्यांनी धमक्यांना भिक न घालता आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. दिपाली पवार यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी भादवी कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरिक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले, संबंधित मांस विक्रेत्याच्या दुचाकीच्या (एमएच १७ बीयु ५ ९३८) डिक्कीत दोन किलो मांस मिळून आले आहे. हे मांस प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणार असून ते कोणत्या प्रजातीचे आहे, त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. या धाडसी महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शहरांमध्ये व तेही श्री गणेश उत्सवाच्या काळामध्ये मांस विक्री होत असल्यामुळे नागरिकांमधून, गणेश भक्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com