गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मिरवणूक मार्गाची पाहणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मिरवणूक मार्गाची पाहणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात गणेश भक्तांकडून जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडूनही उपाययोजना व तयारीला वेग आला आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गणेशोत्सव काळातील बंदोबस्तासंदर्भात नियोजन सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी गणेश मंडळांकडून सुरू आहे. पोलीस अधीक्षक पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी मंगळवारी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

उत्सव काळात व मिरवणुकीवेळी काही ठराविक व संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट लावणे, मिरवणुकीवेळी गैरप्रकार करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटिव्ही लावणे, मार्गावर किती ठिकाणी सीसीटिव्ही आहेत, त्यांची मदत घेणे, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून करावयाच्या उपाययोजना आदींबाबत आढावा घेऊन त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना अधीक्षक पाटील यांनी यावेळी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com