गणरायाचे स्वागत प्रथमच विना जल्लोष अन् विना मंडप

उद्या प्रतिष्ठापना । भक्तांमध्ये उत्साह कायम, पण प्रशासकीय बंधनांमुळे उत्सव शांत शांतच...
गणरायाचे स्वागत प्रथमच विना जल्लोष अन् विना मंडप
Ganpati Bappa

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. दरवर्षी ढोल-ताशांच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचे आगमन होते. यंदा करोनाच्या संकटामुळे सार्वजनिक उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत.

मात्र, गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे चित्र नगरात दिसून येत आहे. ढोल-ताशांचा निनाद अन् गुलालांची मुक्त उधळण करीत निघणारी गणरायाच्या स्वागत मिरवणुकीला भक्त या वेळी प्रथमच मुकणार आहेत.

नगर शहरात करोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. अशा वेळी अनेकांवर घराबाहेर पडण्यासाठी मर्यादा येत आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोणताही खंड पडणार नाही असा निश्चय गणेशभक्तांनी केला आहे. सरकारने गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले आहे.

घरगुती प्रतिष्ठापनेसाठी मूर्तीची उंची दोन फुट, तर सार्वजनिक मंडळांसाठी 4 फुटांपर्यंत मूर्ती घेण्याचे बंधन प्रशासनाने घातले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी लागणारे पूजा साहित्यापासून ते सजावटीच्या साहित्यापर्यंत खरेदी अनेकांनी ऑनलाईन केली आहे.

दरवर्षी हेच साहित्य खरेदी करण्यासाठी नगरकर शहरातील गांधी मैदान, चितळे रोड, वाडिपार्क, प्रोफेसर कॉलनी, भिस्तबाग चौक, एकविरा चौक, भिंगार, केडगाव, बोल्हेगाव यांसह विविध भागांत साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. यंदा मात्र, या गर्दीला ओहोटीला लागलेली आहे. साहित्य खरेदीसाठी घरातील केवळ एकच जण घराबाहेर पडत आहे.

शहरातील कल्याण रोड, शिवाजीनगर, नेप्ती नाका, भुतकरवाडी, सावेडी, तपोवन रोड या भागात गणेशमूर्तींचे कारखाने आहेत. यंदा अनेकजण दुकाने न थाटता कारखान्यातूनच थेट विक्रीला प्राधान्य देत आहेत.

मूर्ती... 50 ते हजारो रुपयांपर्यंत...

प्रतिष्ठापनेसाठी मूर्तीच्या कमाल उंचीवर प्रशासनाने बंधने घातल्याने बाजारात जास्तीत जास्त 4 फुटांपर्यंतच गणेशमूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. त्यामुळे साहजिकच मोठ्या मूर्तींच्या तुलनात्मक किमतीत घट झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती 50 रुपयांपासून व शाडूच्या मूर्ती 200 रुपयांपासून विक्रीस उपलब्ध आहेत. अनेकांनी यंदा शाडूच्या गणेशमूर्तींनाच पसंती दिल्याचे चित्र नगरमध्ये आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com