श्रीगणेश विसर्जनासाठी श्रीरामपूर शहरात 10 ठिकाणी व्यवस्था

नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन करावे-नगराध्यक्षा
श्रीगणेश विसर्जनासाठी श्रीरामपूर शहरात 10 ठिकाणी व्यवस्था

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून सोशल डिस्टन्स पाळता यावे म्हणून यावर्षी गणेशोत्सवानिमित्त श्रीगणेशाचे विसर्जन श्रीरामपूर शहरातील 10 ठिकाणी केले जाणार आहे.

तसेच नागरिकांनी मूर्ती विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले आहे.

मंगळवार दि. 1 सप्टेंबर 2020 रोजी श्रीगणेश विसर्जन करण्यात येणार असून नागरिकांनी घरचे गणपती हे घरीच विसर्जीत करावेत. तसेच इतर संघटनांचे किंवा सार्वजनिक गणेशाचे विसर्जन करण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने शहरात 10 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

यात नॉदर्न ब्रँच, दहावा ओटा, अक्षय कॉर्नरजवळ, काळा राम मंदिर कॅनालजवळ, सरस्वती कॉलनी, गोंधवणी रोड कॅनॉल, मोरगे वस्ती कॅनॉल पूल, गिरमे चौक कॅनाल पूल, खबडी जवळील कॅनॉल पूल, महानुभाव आश्रम पुलाजवळ या दहा ठिकाणी श्रीगणेशाचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. श्रीगणेशाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये तसेच विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून गर्दी करणे टाळावे.

कोव्हिड-19 चे शासनाने विहित केलेले सर्व नियमांचे व शिस्तीचे पालन करून शांततेत विसर्जन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे व नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com