‘गणेश’च्या निवडणुकीत 89 टक्के मतदान

‘गणेश’च्या निवडणुकीत 89 टक्के मतदान

दोन्ही गटाचे विजयाचे दावे || वाढलेल्या मतदानाचा धक्का कुणाला?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सरासरी 89.08 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 91.29 टक्के मतदान राहाता गटात तर कमी मतदान वाकडी गटात 86.01 टक्के मतदान झाले. विखे गट व थोरात-कोल्हे गटाने विजयाचे दावे केले आहेत. गणेशच्या निवडणुकीचे मैदान विधानसभेचे कुरुक्षेत्र बनल्याचे दिसत होते. या निवडणुकीच्या रणभूमीवर कोण बाजी मारणार, हे उद्या सोमवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, वाढलेले मतदान चर्चेचा विषय आहे.

शनिवारी सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेस प्रत्यक्ष सुरुवात झाली. सुरुवातील मतदान केंद्रावर गर्दी कमी होती. नंतर ती वाढत गेली आणि रांगा दिसून येत होत्या. दुपारपर्यंत रांगा टिकून होत्या. तीन वाजेनंतर गर्दी काहीशी कमी झाली. चार नंतर रांगा तुरळक होत्या. एका मतदाराला सर्वसाधारण 5 गटातील पाच मतपत्रिका याशिवाय ओबीसी, महिला राखीव, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती असे एकूण 9 मतपत्रिकांवर मतदान करावे लागत असल्याने या मतदान प्रक्रियेसाठी वेळ जात होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरु होती. त्यामुळे मतदान केंद्रांपुढे मतदारांच्या रांगा होत्या.

शिर्डी गटातील एकूण 1632 मतदारांपैकी 1446 (88.80 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राहाता गटात 1722 मतदारांपैकी 1572 (91.20 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अस्तगाव गटात 1455 मतदारांपैकी 1272 (87.42 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वाकडी गटात 1623 मतदारांपैकी 1396 (86.01 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुणतांबा गटात 1727 पैकी 1574 (91.14 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ब वर्ग गटात 75 पैकी 75 (100 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पाचही गटात 8234 मतदारांपैकी 7335 (89.08 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

गणेशच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का चांगला वाढला आहे. मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. वाकडीत पोलिसांनी एका सभासदाला काठीचा प्रसाद दिला तर अस्तगावला जवळच्या एका गावातील दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलीस आल्यानंतर त्यांनी ‘आम्ही ते नव्हेच’ अशी भुमिका घेतल्याने पोलिसांनी कारवाई केली नाही. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे वाकडी तसेच पुणतांबा गटात ठाण मांडून होते. अस्तगाव तसेच इतर गटांमध्ये खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अ‍ॅड.अजित काळे यांनी भेटी दिल्या. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही गटांना भेटी दिल्या. संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी राहाता येथे ‘ब’ वर्ग मतदार संघात मतदान केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com