
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
गणेश सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत कोल्हे गटाने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी पुणतांबा येथील कोल्हे समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे. काल सोमवारी दुपारी युवा नेते विवेक कोल्हे पुणतांबा मार्गे कोपरगावला जात असतांना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुणतांबा येथे कोल्हे यांची गाडी अडविण्यात आली.
यावेळी संभाजी गमे, संजय जाधव, बाळकृष्ण जाधव, सर्जेराव जाधव सह अनेक कार्यकर्ते सहभागी होते. गणेश सहकारी साखर कारखान्याची 19 जागासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. कारखान्याच्या जडणघडणीत माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांचे महत्वाचे योगदान आहे. 1989 मध्ये बंद पडलेला हा कारखाना कोल्हे पॅटर्नच्या माध्यमातून त्यांनी उर्जितावस्थेत आणला होता. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कारखाना निवडणूकीत कोल्हे कुटुंबियांनी लक्ष घालावे, अशी भावना कार्यकर्त्यांनी श्री. कोल्हे यांच्यापुढे व्यक्त केली.
मात्र या विषयाबाबत फारसे भाष्य न करता श्री. कोल्हे यांनी सर्वांचा निरोप घेऊन ते पुढे मार्गस्थ झाले. दरम्यान गणेश कारखान्याच्या निवडणुकीत तिकिट मिळावे म्हणून अनेक इच्छुकांनी विखे गटाकडे जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. या निवडणुकीत माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे काय भूमिका घेतात याकडे कारखान्याच्या सभासदाचे लक्ष लागून आहे. येत्या काही दिवसात गणेश कारखान्याच्या निवडणुकीचा धुराळा चांगलाच उडण्याची शक्यता आहे. दरम्यान या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनेल उभा करण्याची शक्यता आहे.