
श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur
मुलगा व मुलगी यांच्यात भेदभाव न करता त्यांना समान वागणूक द्यावी, बचत गटातील महिलांनी स्वतःच्या घरापासून या कामास सुरुवात करणे अपेक्षित आहे. आपल्या परिसरात कोटुंबिक छळ व हिंसा होत असेल तर त्याविरोधात आवाज उठविण्याचे काम गटांनी करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले.
श्रीरामपूर नगर परिषदेच्यावतीने लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ‘नयी चेतना पहल बदल की’ यावर आधारित हिंसा समाप्त करण्याबाबत महिला बचत गटांची जाणीव जागृती कार्यशाळा, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण तसेच 4 बचत गटांना 10 लाख रुपयांचे बँक ऑफ महाराष्ट्रदवारे कर्ज वितरण कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षपदावरुन मुख्याधिकारी शिंदे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अॅड. रेश्मा तांबोळी होत्या.
यावेळी शहर अभियान व्यवस्थापक रेखा चाटे, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक विवेक यादव, एलआयसीचे डेव्हलपमेंट ऑफिसर भाग्येश कोठावळे, पंचायत समितीच्या शुभांगी माळी, उपमुख्याधिकारी धनंजय कविटकर, लेखापाल रमेश निकाळजे, शहर अभियान व्यवस्थापक स्वाती निरगुडे, शुभांगी माळी, लोकमान्य टिळक वाचनालयच्या ग्रंथपाल स्वाती पुरे उपस्थित होते.
यावेळी अॅड. तांबोळी यांनी महिलांबाबतच्या कायदेविषयक मार्गदर्शन केले. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणेसाठी सतत प्रयत्नशील रहावे, जेणेकरून गरिबीतून बाहेर पडण्यास त्यांना मदत होईल, असे त्या म्हणाल्या. याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक, एलआयसीच्या अधिकार्यांनी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक रेखा चाटे यांनी केले. प्रास्ताविक उपमुख्याधिकारी धनंजय कविटकर यांनी तर शहर अभियान व्यवस्थापक स्वाती निरगुडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी समुदाय संघटक वर्षा पाठक, हरिष पैठणे, जयश्री वाडकर, माविम स्टाफ तसेच लोकमान्य टिळक वाचनालयच्या ग्रंथपाल स्वाती पुरे व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.