पुणतांबा गावचे वाळवंट करण्याचा घाट - जाधव

पुणतांबा गावचे वाळवंट करण्याचा घाट - जाधव

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राहाता तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा गावाच्या विकासाची प्रक्रिया पूर्ण पणे ठप्प झाली आहे. पुणताबा गावाचे जाणून बुजुन वाळवंट करण्याचा घाट घातलेला आहे. अजूनही पुणतांबेकर शांत आहेत मात्र ह्या संयमाचा उद्रेक होण्याची कोणी वाट पाहू नये असा इशारा मनसेचे राहाता तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांनी दिला आहे.

1984 मध्ये चांगदेव कारखाना बंद पडल्यानंतर पुणतांबा येथे पर्यायी उद्योग सुरु केला जाईल, अशी वांरवार घोषणा केली गेली. प्रत्यक्षात गेल्या 38 वर्षात पर्यायी उद्योग सुरू झाला नाही. दौंड-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्व ठिकाणी भुयारी पूल झाले आहेत. मात्र पुणतांबा येथील स्टेशन रोड अद्यापही भुयारी पूलाचे काम सुरु झाले नाही. 25 वर्षात उड्डाण पुलाच्या गप्पा पुणतांबेकरांनी ऐकल्या.

मात्र भुयारी नाही व उड्डाण पूलही नाही. पुणतांबा रोटेगाव रेल्वे मार्गाचे गाजर केंव्हाच मागे पडले आहे. विशेष म्हणजे पुणतांबा रेल्वे स्टेशनला जंक्शनचा दर्जा मिळवून एकाही जलद रेल्वे गाड्यांना थांबा मिळालेला नाही. या प्रश्रावाबत निवेदने देऊन पुणतांबेकर कंटाळले आहेत. जागतिक बँकच्या सहकार्याने गावासाठी अंदाजे 17 कोटी रुपये खर्चाच्या पूरक पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. निकृष्ट कामामुळे या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. मात्र कोणताही लोकप्रतिनिधी याबाबत ‘ब्र’ शब्द काढत नाही.

गावाला जोडणारे व गावातील रस्त्यांची दुरावस्था बघितल्यानंतर कोणाचाही विश्वास बसणार नाही एवढी वाईट अवस्था आहे. विशेष म्हणजे वांरवार मागणी करूनही पुणतांबा येथे साधी आयटीआय सुरु होत नाही. पुणतांबा गाव राहाता तालुक्यात आहे. राहाता तालुका म्हटला की राज्यात वेगळा संदेश जातो. मात्र पुणतांबेकरांच्या मनात कधी कधी शल्य निर्माण होते. तालुका राहाता मात्र विधान सभेसाठी कोपरगाव मतदार संघ. म्हणजे पुणतांबेकरांची अवस्था ‘ना घरका ना घाटका’ अशी झालेली आहे.

गावाला खंबीर नेतृत्व नसल्यामुळे पुणतांबा गावाला कोणी गृहीत धरत नाही. याबाबत साशंकता आहे. नेते काही म्हणत असले तरी ग्रामस्थांत चीड आहे. तरी ग्रामस्थ संयम बाळगून आहे. मात्र या संयमाचा येत्या काही दिवसात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असेही श्री. जाधव यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com