...तर विसर्जन मिरवणुकीसाठी वेळ वाढवून देवू - पोलीस अधिक्षक पाटील

पोलीस अधिक्षक मनोज पाटील
पोलीस अधिक्षक मनोज पाटील

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वेळ वाढवून देण्याबाबत संगमनेर शहरातील सर्व गणेश मंडळांनी मागणी केली तर या मागणीचा आदर केला जाईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमी संगमनेर येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, गणेशोत्सव बाबत पदाधिकार्‍यांनी वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत. या सूचनांची निश्चितपणे दखल घेतली जाईल. संबंधित खात्याला याबाबत सूचना देण्यात येईल. विसर्जन मिरवणुकीचा वेळ वाढवून द्यावा अशी मागणी बहुतेक सदस्यांनी केली आहे. याबाबत आपण अनुकूल आहोत. संगमनेर येथील सर्व गणेश मंडळांनी मागणी केली तर या मागणीचा निश्चितपणे आदर केला जाईल याबाबत आपण जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करू, वेळेबाबत बदल करण्यासाठी प्रशासन अनुकूल आहे, असे त्यांनी सांगितले. गणेश उत्सवासाठी बंधने लावण्याचा प्रशासनाचा उद्देश नाही.

समाजाला त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असतो विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश मंडळांनी कृपा करून डॉल्बी व प्लाजमा यांचा वापर करू नये. डॉल्बीच्या मोठ्या आवाजाचा प्रत्यक्ष अनुभव पोलीस कर्मचार्‍यांनी घेतलेला आहे. या आवाजामुळे एक कर्मचारी बहिरा झाला असून दुसर्‍याला हृदयाचा झटका आलेला आहे. यासाठी दोन अधिक दोन चे पालन करावे. गणेश उत्सवाच्या काळामध्ये मोबाईलचा जपून वापर करावा, मोबाईल वरून मेसेज पाठवताना दक्षता घ्यावी, मोबाईलचे मेसेज सण उत्सवावर प्रभाव पडू शकतात. सोशल मीडियाचा योग्य वापर केला जावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी गणेश उत्सवासाठी प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या नियोजनाची माहिती दिली. विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतलेली आहे. शहरातील पाच ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात येणार आहे. मोकाट जनावरांवर कारवाई सुरू केलेले आहे. रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्नही सोडविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले, शौकत जागीरदार, सोमेश्वर मंडळाचे आप्पा खरे, प्रा. सोपानराव देशमुख, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, भगवान गीते, अविनाश भोर, अशोक सातपुते, शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कातारी, नरेश माळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत वामन, गोपाल राठी, किशोर पवार, दिनेश सोमानी आदी पदाधिकार्‍यांनी विविध सूचना केल्या. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करावे, वीज वितरण कंपनीने गणेश उत्सवात विघ्न आणू नये आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.

गणेश उत्सवासाठी सहकार्य करणार्‍या मान्यवरांचा सन्मान गणेश उत्सव काळामध्ये शांतता, प्रदूषण विरहित गणेश उत्सव यासह विसर्जन मिरवणुकीसाठी सहकार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांचा याप्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मालपाणी उद्योग समूहाचे मनीष मालपाणी, एकविरा फाउंडेशन, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आदी संस्थांच्या पदाधिकार्‍यांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com