नंबरच्या वादावर पोलिसांकडून चिठ्ठीचा पर्याय

शिवसेनेच्या मंडळावर दोन्ही गटाचा दावा
नंबरच्या वादावर पोलिसांकडून चिठ्ठीचा पर्याय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहर शिवसेनेच्या मंडळावर शिवसेनेसह शिंदे गटाने केलेला दावा व त्यावरून निर्माण झालेल्या नंबरच्या वादावर पोलिसांनी चिठ्ठी टाकून नंबर निश्चित करण्याचा तोडगा काढला आहे. बुधवारी सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात चिठ्ठी काढून नंबर निश्चित केले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली.

शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीमध्ये ग्रामदैवत माळीवाडा विशाल गणेश देवस्थानचा गणपती पहिल्या क्रमांकावर असतो. त्यानंतर इतर मानाचे 11 गणपती रांगेत असतात. त्यानंतर तेराव्या क्रमांकावर जय आनंद महावीर युवक मंडळ, चौदाव्या क्रमांकावर नगर शहर शिवसेना व पंधराव्या क्रमांकावर दोस्ती गणेश मंडळ असते. शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर या दोन्ही गटांनी चौदाव्या क्रमांकावरील मंडळावर आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी आता चिठ्ठी काढून मंडळाचे नंबर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी सकाळी 11 वाजता कोतवाली पोलीस ठाण्यात विशाल गणेश देवस्थानचा गणपती वगळता इतर 15 मंडळाच्या नावाने चिठ्ठ्या टाकण्यात येणार आहेत. निघालेल्या चिठ्ठीनुसार या मंडळांना दोन ते 16 असे क्रमांक देण्यात येणार असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. दरम्यान मानाचा गणपतींचे क्रमांक गेल्या अनेक वर्षांपासून तसेच आहेत, त्यामुळे मानाच्या गणेश मंडळाकडून हा तोडगा स्वीकारला जाणार का याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीवर ताबा मारण्यासाठी शिंदे गट सरसावला आहे. सोमवारी शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिंदे यांची भेट घेत शहर शिवसेनेच्या गणेश मंडळास मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी द्यावी, अशी रितसर मागणी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com