तीन दिवसासाठी 800 जण होणार हद्दपार

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय || 2881 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
तीन दिवसासाठी 800 जण होणार हद्दपार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण आहे. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर उपाय योजना करण्यात आल्या आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्हाभरात विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने तब्बल 2881 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. यात 26 ते 28 सप्टेंबर असे तीन दिवस 806 जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.

गेल्या काही महिन्यात नगर शहरासह जिल्हाभरात जातीय तणाव निर्माण होणार्‍या घटना घडल्या आहेत. तसेच, राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थिती नंतर राजकीय वादाच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गणेशोत्सवात राजकीय शक्ती प्रदर्शनही मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. त्यातच वादग्रस्त स्टेटसच्या थांबलेल्या घटना पुन्हा सुरू झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने गणेशोत्सवातील शेवटच्या तीन दिवसात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कठोर पावले उचलली आहेत. कलम 107 अंतर्गत 774 जणांवर, कलम 110 अंतर्गत 149 जणांवर, कलम 144(2) अंतर्गत 806 जणांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

तसेच कलम 149 अंतर्गत तब्बल 1059 जणांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात येणार आहेत. तसेच मुंबई दारू विक्री प्रतिबंध कायद्यानुसार 81 दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय 12 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यातील तीन मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 122 अधिकारी, 1725 कर्मचारी, शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाचे पथक, स्ट्राईकिंग फोर्स, 1650 होमगार्ड असा जिल्ह्यातील बंदोबस्त आहे.

याशिवाय जिल्ह्याबाहेरून 16 अधिकारी, 250 कर्मचारी, राज्य राखीव दल व शीघ्र कृती दलाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. शहरात मिरवणूक मार्गावर व इतरत्र 733 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे वॉच ठेवण्यात येत आहे. दुसरीकडे, नगर शहरातील तणाव वाढवणार्‍या घटनेनंतर पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व वरीष्ठ अधिकारी स्वतः रात्री उशिरापर्यंत गस्त घालत आहेत. गणेश मंडळांमध्ये सुरक्षा रक्षक अथवा रात्रीच्यावेळी कुणी आहेत का, याचीही तपासणी केली जात असल्याचे अपर अधीक्षक खैरे यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com