गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू
सार्वमत

गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू

Arvind Arkhade

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

यंदाचा गणेशोत्सव करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा होणार असला तरी घरगुती गणेशोत्सव नेहमीप्रमाणे होणार असल्याने छोट्या गणेशमूर्तींची मागणी नेहमीइतकीच राहणार आहे. त्यामुळे या गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला मूर्ती कारागिरांनी वेग दिला असून रंग देण्याचे काम सध्या सुरू आहे.

विघ्नहर्त्या गणेशाचं आगमन चार दिवसांवर येऊन ठेपलंय. करोनामुळे शहरामध्ये गणेश मंडळांची गणेश उत्सवाची तयारीची लगबग दिसत नाही दरवर्षी या काळात वर्गणी, मंडप उभारणी, सजावट, लेझीम डाव, ढोल पथक सराव आदी तयारी जोरात सुरू असते.

यंदा मात्र तसे नाही. घरगुती गणेश स्थापनेसाठी सगळीकडेच मूर्ती तयार करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. मातीपासून बनवलेल्या श्रीगणेश मुर्तीना रंग देण्याचे काम सुरू आहे. इकोफ्रेंडली गणेशोत्सवाकडे लोकांचा कल वाढत असल्यामुळे मातीच्या मूर्तींची मागणी वाढली आहे.

तालुक्यातील खुपटी येथील बाबासाहेब ज्ञानदेव शिर्के, रवींद्र ज्ञानदेव शिर्के व घरातील सर्व व्यक्ती हा पारंपारिक मातीचे गणपती बनवण्याचा व्यवसाय करतात.

नेवासा व परिसरातील सर्व खेड्यांना आम्ही गणपती पुरवितो. गणेशोत्सवामध्ये ग्रामीण भागामध्ये अतिशय माफक दरामध्ये गणेश मूर्ती उपलब्ध करून देतो. करोनामुळे घरोघरी गणपती बसवण्यात येणार असल्याने मोठ्या आकाराचे गणपती न बनवता घरगुती पूजेसाठी छोट्या मूर्ती अधिक संख्येने बनविल्या आहेत. आम्ही इतरत्रही नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद ,जालना येथेही मूर्ती बनवून पाठवतो.

- बाबासाहेब शिर्के, मूर्ती कारागीर, खुपटी

गणेश विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी इकोफे्रंडली गणपतींचे आपण घरीच पाण्यात विसर्जन करून माती झाडाभोवती टाकून जलप्रदूषण टाळू शकतो. याबाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.

- अशोक चौधरी पर्यावरण प्रेमी, खुपटी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com