गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा - आ. विखे
सार्वमत

गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा - आ. विखे

Arvind Arkhade

लोणी|वार्ताहर|Loni

गणेश उत्सवात आयोजित करण्यात येणारा प्रवरा सांस्कृतीक व क्रिडा महोत्सव करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्यात आला असून, कुटुंबाच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या आरोग्य रक्षणासाठी यावर्षीचा गणेश उत्सवही घरगुती पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्राव्दारे गणेश मंडळांना केले आहे.

गेली अनेक वर्षे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राहाता तालुक्यातील गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरील कलाकारांना व्यासपीठ मिळावे म्हणून या उत्सवाच्या पार्श्वभूमिवर प्रवरा सांस्कृतीक व क्रिडा महोत्सवाचे आयोजनही करण्यात येते.

या महोत्सवात लोकसहभागही मोठा असतो. त्यामुळे या सांस्कृतीक महोत्सवाचा नावलौकीकही मोठा झाला. यंदा मात्र करोना संकटाचे सावट या उत्सवावर असल्याने यंदाचा गणेश उत्सव साध्या पध्दतीने घरातच साजरा करण्याचे आ. विखे पाटील यांनी सुचित केले आहे.

या संदर्भात आ. विखे पाटील यांनी तालुक्यातील गणेश मंडळ, ग्रामस्थ आणि पदाधिकार्‍यांना एका पत्राव्दारे केलेल्या आवाहानात, महाराष्ट्राचे सांस्कृतीक वैभव असलेल्या श्रीगणेश उत्सवाला 22 ऑगस्टपासुन सुरुवात होत असली तरी, कोवीड-19 च्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या महामारीच्या संकटाने या उत्सवावर व आनंदावर यंदा मर्यादा आल्या आहेत. उत्सवात होणार्‍या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती असल्याने यावर्षीचा सांस्कृतीक व क्रिडा महोत्सव रद्द करुन हा गणेश उत्सव घरगुती व साध्या पध्दतीने साजरा करण्याची आवश्यकता आहे.

करोनाचे संकट रोखण्यासाठी आतापर्यंत आपण सर्वांनी कसोशिने प्रयत्न केले असुन, कुटुंबाच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या आरोग्य रक्षणासाठी विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव घरातच सार्वजनिकरित्या न करता साजरा करुन हे संकट दुर करण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन आ.विखे पाटील यांनी सर्व गणेश भक्तांना केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com