वाजत-गाजत बाप्पांचे आगमन

गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साह || विशाल गणेश मंदिरात ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा
वाजत-गाजत बाप्पांचे आगमन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून धडाक्यात प्रारंभ झाला. गणेशभक्तांनी वाजत गाजत मिरवणूका काढून श्रींची प्रतिष्ठापणा केली. गणरायाच्या आगमनासोबत सर्वत्र उत्साह संचारला आहे. साहित्य खरेदीसाठी काल सायंकाळपासून गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये आज सकाळीही गर्दी दिसून आली.

जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणूका जल्लोषात होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता. दरम्यान, बाजारपेठेत चैतन्य पसरले आहे.

दोन वर्षाच्या खंडानंतर यंदाचा गणेशोत्सव संपूर्ण निर्बंधमुक्त साजरा होत आहे. कोविड काळानंतर जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आल्याने यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात होणार, याचा अंदाज होता. त्याचे प्रत्यंतर गेल्या काही दिवसांतील गणेशोत्सवाच्या तयारीवरून दिसून आले. आज श्रींची प्रत्यक्ष प्रतिष्ठापणा होत असताना ढोल-ताशे आणि बाप्पांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. कालपासूनच बाजारात गणेश मूर्ती आणि पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी उसळली होती. गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहाने मूर्ती, फुले, सजावटीचे साहित्य, रोषणाई, मखर, पाट आदी साहित्याची खरेदी केली. घरगुती गणपती स्थापनाही जल्लोषात झाली. काहींनी काल मूर्ती निश्चित करून ठेवली होती. बुधवारी सकाळी अनेकांनी वाजत गाजत मोटरसायक, कार आदी वाहनातून गणरायाची मिरवून काढली.

शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र व सौ.दिपाली भोसले यांच्या हस्ते ‘श्रीं’ची विधीवत प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर सजले आहे. मंदिरात 5 सप्टेबर रोजी सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत अग्नीहोत्र कार्यक्रम होईल. 6 रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत सामुहिक अथर्वशिर्ष पठणाचा कार्यक्रम होईल. 6 ते 8 सप्टेंबर या काळात गणेश याग होणार आहे. 9 रोजी गणेश विसर्जन दिनी सकाळी 8.30 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व सौ.मिनल पाटील यांच्या हस्ते उत्थापन पुजा होणार आहे.

पर्यावरण जपा !

आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर गणेश मंडळांनी जनजागृती करावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करा. गणपतीच्या आशीर्वादानं कोरोनाचं संकट दूर झालं आहे. यंदा आपण निर्बंधमुक्त गणेशोत्सव करत आहोत. गणरायाचं स्वागत करताना महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करुया.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com