प्रत्येक गावात आज एक तास श्रमदान

स्वच्छता ही सेवा मोहीम || गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला स्वच्छता अभियान
प्रत्येक गावात आज एक तास श्रमदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास श्रमदान मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात एक तास श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ही मोहीम राबवून महात्मा गांधीजींना हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे. श्रमदान मोहिमेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात गावागावात सार्वजनिक परिसर, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, मंदिरे, बाजारतळ, बस स्थानक, नदी किनारे, तलाव या ठिकाणी तसेच इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.

या मोहिमेंतर्गत ग्रामपंचायती स्वच्छता मोहिमेसाठी जागा निवडतील. ही सर्व ठिकाणे नकाशावर उपलब्ध असतील. https://swachhatahiseva.com या सिटीझन पोर्टलवर उपलब्ध पर्यायांद्वारे पाहता येतील आणि निवडता येतील. याद्वारे नागरिक स्वच्छता अभियानाच्या ठिकाणी त्यांचे फोटो क्लिक करू शकतील आणि ते या पोर्टलवर अपलोड करू शकणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com