गट-गण आरक्षण सोडतीला स्थगिती

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष
गट-गण आरक्षण सोडतीला स्थगिती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांची गट-गण रचना अंतिम झाल्यावर व आता आरक्षण सोडतीनंतर आठवडाभरात मतदार याद्याही अंतिम होण्याची चिन्हे असताना आरक्षण सोडतीला स्थगिती दिल्याने इच्छुकांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षा आली आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणाबाबत पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत आरक्षण सोडतींना स्थगिती देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दिले आहेत.

नगर जिल्हा परिषदेच्या 85 जागा व जिल्ह्यातील 14 तालुका पंचायत समित्यांच्या 170 जागांच्या गट व गण रचना अंतिम झाल्या आहेत. यावरील हरकतींची सुनावणी होऊन त्याचा निकालही जाहीर झाला आहे. न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्याने ते वगळून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच या दोन प्रवर्गांसह खुल्या जागांतील महिला सदस्यांच्या आरक्षणासाठी निवडणूक आयोगाने बुधवारी (दि.13) तारीख निश्चित केली होती. जिल्हा परिषदेच्या 85 जागांपैकी 11जागा अनुसूचितजातींसाठी तर 8 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे.

याशिवाय या दोन्ही जागांपैकीनिम्म्या म्हणजे अनुक्रमे 6 व 4 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तसेच खुल्या राहिलेल्या 66 जागांपैकीही 33 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे या सर्वमिळून 43 जागांसाठी आज आरक्षण सोडत होणार होती. पंचायत समित्यांच्याही सर्व मिळून 170 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 22 व अनुसूचितजमातीसाठी 16 जागांपैकी निम्म्या महिलांसाठी म्हणजे अनुक्रमे 11 व 8 आणिखुल्या राहिलेल्या 132 जागांपैकी महिलांसाठी 66 अशा सर्व मिळून 86 जागा राखीव होणार होत्या.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कोणत्या गटावर व पंचायत समित्यांच्या कोणत्या गणावर कोणते आरक्षण पडते, हे पाहून त्यानुसार कोणत्या गट-गणातून कोणाला उतरवायचे, कोणत्या गट-गणात महिलांना संधी द्यायची, याचे नियोजन बड्या नेत्यांकडून व त्यांच्या दुसर्‍या फळीतील समर्थकांकडून सुरू होते. पण आजची आरक्षण सोडत रद्द झाल्याने अनेकांच्या आशेवर पाणी पडले. अर्थात आताचे आरक्षण ओबीसी राखीव जागांशिवाय होणार होते. त्यामुळे आता भविष्यातील आरक्षण सोडत ओबीसी राखीव जागांसह अपेक्षित आहे.

मतदार याद्यांबाबत संभ्रम

राज्य निवडणूक आयोगाने गट-गणांतील आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 18 जुलै जाहीर केली आहे. 31 मे 2022 रोजीच्या विधानसभा मतदार याद्या ग्राह्य धरून प्रत्येक विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद गटांचे व पंचायत समिती गणांचे क्षेत्र वेगवेगळे करून त्यांच्या प्रारुप मतदार याद्या जाहीर होणार आहेत. आरक्षण सोडतीला स्थगिती दिली असली तरी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्धीला स्थगिती नाही. त्यामुळे या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर 22 जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत व त्या याद्या 8 ऑगस्टला अंतिम होणार आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com