संगमनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

25 हजार रोकडसह 3 लाख 26 हजार 400 चा मुद्देमाल जप्त
संगमनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर खुर्द शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 25 हजार 100 रुपयांच्या रोकडसह एकूण 3 लाख 26 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी तिरट नावाचा जुगार खेळताना दहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्या सर्वांवर मुंबई जुगार अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास करण्यात आली.

संगमनेर खुर्द शिवारात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदिवे, पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर माने, आकाश काळे, शिवाजी ढाकणे या पथकाला कारवाई करण्याच्या दिलेल्या सुचनेवरून या पथकाने 6.30 वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द शिवारातील जुन्या संगमनेर-पुणे रस्त्यावर आडोशाला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

सदर ठिकाणी तिरट नावाचा हारजीत असलेला तीन पत्त्यांचा खेळ सुरू असल्याचे व घोळक्याने बसलेल्या लोकांच्या मध्यभागी पैसे असल्याचे पोलिसांना दिसले. त्या सर्वांना त्याच स्थितीत उभे राहण्याचे आदेश देत पोलिसांनी जुगारासाठी वापरल्या जाणार्‍या सर्व साहित्यासह 25 हजार 100 रुपयांची रोख रक्कम, 8 मोबाईल व 5 दुचाकी असा एकूण तीन लाख 26 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन दत्तात्रय अडबल यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शुभम गोपाल शाहू (वय 28, रा. साईनगर, संगमनेर), प्रशांत एकनाथ जोर्वेकर (वय 45 रा. जोर्वेरोड), राजेंद्र मल्हू गायकवाड ( (रा. शिवाजीनगर, संगमनेर), वसंत दुर्गा शिंदे (रा. रायतेवाडी फाटा), दशरथ शिवराम भुजबळ (वय 51 रा. इंदिरानगर, संगमनेर), बाळासाहेब भीमा मांडे (वय 42, रा. जाखुरी), नवनाथ कारभारी पानसरे (वय 48, रा. जाखुरी), जुबेर नवाब शेख (वय 50, रा. वॉर्ड क्र. 1, श्रीरामपूर), दिनेश श्याम जाधव (वय 35 रा. अकोले नाका) व अनिल एकनाथ राक्षे (वय 47 रा. संगमनेर खुर्द) अशा एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 833/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर मुंबई जुगार कायद्याच्या कलम 12 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यादव करत आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com