
अहमदनगर| Ahmednagar
स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याचे हद्दीत दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर (क्लब) छापेमारी करून सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुमारे ४५ जुगारी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तोफखाना व एकविरा चौकातील जुगारावर ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीच्या निरीक्षकपदी दिनेश आहेर यांची नियुक्ती करताच एलसीबी 'ॲक्शन मोड' मध्ये आली आहे. अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षक आहेर यांच्या नेतृत्वाखाली परी. पोलीस उपअधीक्षक पाटील व ओमणे यांच्यासह एलसीबी पथकाने तोफखाना व एकविरा चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापेमारी केली. या कारवाईदरम्यान रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, वाहने असा सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जुगार खेळणाऱ्या सुमारे ४५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान एलसीबीने छापेमारी सुरू केल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एकप्रकारे एलसीबी 'ॲक्टिव्ह' झाल्याचे दिसून येत आहे