
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील सिध्दीबागेजवळ पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकून कारवाई केली. पाच जणांना पकडून त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दुचाकी असा 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अंमलदार सतीश भवर यांनी फिर्याद दिली आहे. आदित्य सोमनाथ टाक (वय 25 रा. शितळा देवी चौक, तोफखाना), सुनील रमेश गोरे (वय 57 रा. दत्त चौक, शिवाजीनगर, केडगाव), तुषार सदाशिव आंबेकर (वय 33 रा. सारसनगर), मुकेश प्रताप कंडारे (वय 34 रा. एस.टी. कॉलनी, सर्जेपुरा), बबन बाबुराव कोकणे (वय 58 रा. जाधव मळा, बालिकाश्रम रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सिध्दीबागेजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये तिरट जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार दत्तात्रय जपे, अहमद इनामदार, वसिम पठाण, संदीप धामणे, संदीप गिर्हे यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने रविवारी सायंकाळी नमूद ठिकाणी छापा मारला असता पाच जण जुगार खेळताना मिळून आले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व दुचाकी मिळून आली. पोलिसांनी सर्व मिळून 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.