जुगार खेळणार्‍या सहा जणांना पकडले

तोफखाना पोलिसांची बागडपट्टीत कारवाई
जुगार खेळणार्‍या सहा जणांना पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

बागडपट्टी परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला. मंगळवारी रात्री साडे दहा वाजता ही कारवाई करण्यात आली. सहा जुगार्‍यांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, चारचाकी वाहन असा 12 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार सतीश त्रिभुवन यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्रकुमार चमारी मंडल (वय 32), अमितकुमार अनिलसिंह सिंग (वय 31 दोघे मूळ रा. बिहार, हल्ली रा. बागडपट्टी), गणेश प्रल्हाद चोभे (वय 40 रा. बाबुर्डी बेग ता. नगर), अमनकुमार सिलकुमार (वय 20 मुळ रा. उत्तरप्रदेश, हल्ली रा. बागडपट्टी), मनोज सुखदेव जगताप (वय 35 रा. मूळ रा. मालधक्का रोड, देवळाली गाव, नाशिक, हल्ली रा. बागडपट्टी), राहुल गौरिशंकर सिंग (वय 26, मुळ रा. बिहार, हल्ली रा. बागडपट्टी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

बागडपट्टी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये तिरट जुगार सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांना दिले. उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, दत्तात्रय जपे, अहमद इनामदार, अविनाश वाकचौरे, वसिम पठाण, संदीप धामणे यांच्या पथकाने दोन पंचासमक्ष बागडपट्टीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. सहा जुगार्‍यांना पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com