गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवणार

उपमुख्यमंत्री फडणवीस || हजारे यांना भेटून आनंद
गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवणार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अनेक दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटून आनंद झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावे जल स्वयंपूर्ण करण्याची योजना जाहीर केली. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही हजारे यांची आवडती योजना आता सरकार प्रभावीपणे राबविणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.

पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, हजारे आणि पवार यांच्या प्रेरणेतून सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना मधल्या काळात राजकारणामुळे बंद पडली होती. आता ती पुन्हा सुरू करीत आहोत. हजारे यांची खूप दिवस प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. फोनवर बोलणे होत असे. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची भेट होणार असल्याने आपण येथे आलो. हजारे यांच्या विचारांतील गाळमुक्त धरण आणि गाळयुत्त शिवार ही योजना राबविण्यात येणार आहे. यातून धरणांतील गाळ काढला जाऊन पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि तोच गाळ शिवारात आल्याने उत्पादन वाढीस मदत होईल. यातून गावे जलस्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

पशुधनाचे महत्व सांगताना फडणवीस म्हणाले, आपल्या संस्कृतीत गायीची पूजा केली जाते, गाईला माता मानले जाते. सुरवातीला यावर जगातील काही मंडळी हसत होती. आता मात्र हे सर्वांनी मान्य केले आहे. शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी पशुधन आवश्यक आहे. शेती आणि पशुखाद्य क्षेत्रातही नैसर्गिक उत्पादने आणि दर्जा यावर भर दिला पाहिजे. पशुखाद्य क्षेत्रात हे काम यशस्वी होण्यासाठी आवश्यक ती प्रचार-प्रसार मोहीम राबविण्यास सरकार तयार आहे.

रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन नैसर्गिक शेतीला चालना मिळाली तर शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन नफाही वाढेल. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविताना या गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे. राळेगणसिद्धी येथून सौर कृषीपंप फीडर योजना सुरू झाली. ती कमालीची यशस्वी झाली आहे. त्यामुळे त्याचा पुढचा टप्पा आता सुरू करीत आहोत. त्यातून शेतकर्‍यांना स्वस्तात आणि दिवसाही वीज मिळण्यास मदत होणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com