सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील गळनिंबसह 22 गावांना जीवनदायिनी ठरलेली जीवन प्राधिकरण योजनेला

ऐन उन्हाळ्यात वीज जोडणी तोडल्याचा फटका बसल्याने प्रचंड पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.

गळनिंबसह 22 गावांसाठी असलेली जीवन प्राधिकरण योजना चालू झाल्यापासूनच ‘असून अडचण नसून खोळंबा’ बनली आहे. थकित वीजबिल पाणी गळती कधी कामगारांच्या अडचणी तर कधी राजकिय आखाड्यात ही योजना अडकून पडली आहे. काही गावांनी योजना सक्षमपणे चालत नसल्याने ठराव करून या योजनेतून अंग काढून घेतले आहे.

मात्र ज्या गावांना पाण्याचा दुसरा स्त्रोत नसल्यामुळे कायमच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . त्यातच सलाबतपूरसारख्या बाजारपेठ असलेल्या गावाला तर तीनही ऋतुंमध्ये पाणीटंचाई ही पाचवीला पुजलेली. आजतागायत ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्य मंडळाला कायमस्वरूपी पाण्याचा स्त्रोत उभारता आला नाही . पाण्यासारख्या जिव्हाळ्याचा प्रश्नाकडं कुणीच लक्ष द्यायला तयार नसल्याने पाणीप्रश्न नक्की कधी सुटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या सलाबतपूर गावात पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. विहिरी कुपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. ज्यांच्या विहिरींना पाणी आहे त्यांनी पाणी विक्रीचा व्यावसायच सुरू केला आहे. हजारो रुपयांची कमाई या पाणी विक्रीच्या धंद्यातून हे करत आहेत. ज्यांची अर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांना पाणी विकत घेणे परवडते. मात्र रोज मोलमजुरी करणारी कुटुंबं आहेत त्यांचा विचार कोणी करायचा? असा प्रश्न आहे. नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी असलेले प्रशासन सध्या पाणीटंचाईबाबत सर्व काही माहिती असूनही येड घेऊन पेडगावला जायची भूमिका बजावताना दिसतंय.

गेल्या वर्षभरापासून जनता करोनाचा सामना करत आहे. करोनामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अजूनही परिस्थिती विस्कळीत आहे. त्यातच करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. मजुरांना हाताला काम मिळेना. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यातच पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.