गळनिंब खून प्रकरणात गोपाळपूरचा ढोकणे गजाआड

एलसीबी पथकाने ठोकल्या बेड्या
गळनिंब खून प्रकरणात गोपाळपूरचा ढोकणे गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गळनिंब (ता. नेवासा) येथील प्रवीण सुधाकर डहाळे (वय 24) या युवकाच्या खूनप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार असलेला शरद कुंडलिक ढोकणे (वय 43 रा. गोपाळपुर, ता. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी माळीचिंचोरा (ता. नेवासा) शिवारातून ताब्यात घेत गजाआड केले आहे. गुन्हा घडल्यापासून ढोकणे पसार झाला होता. एलसीबीचे पथक त्याच्या मागावर होते. अखेर त्याला अटक करण्यात आली असून नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

27 ऑक्टोबर रोजी प्रवीण डहाळे याला शेखर अशोक सतकर, माऊली उर्फ अरूण दत्तात्रय गणगे, अशोक उर्फ खंडु किसन सतकर (सर्व रा. सुरेगाव, ता. नेवासा), दीपक सावंत (पुर्ण नाव माहित नाही, रा. नगर), ईश्वर पठारे (रा. वरखेड, ता. नेवासा), जालींदर बिरूटे (रा. वरखेड) व इतर दोन ते तीन अनोळखी इसमांनी मागील भांडणाच्या कारणावरून तलवार, कोयते, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला होता. याप्रकरणी प्रमोद संभाजी कापसे (वय 24 रा. सुरेगाव) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर काही तासांत एलसीबी पथकाने चौघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत शरद ढोकणे याचे नाव समोर आले होते.

त्याचे 302 नंबरचे चारचाकी वाहनही या गुन्ह्यात वापरले असल्याचे पोलिसांना समजले होते. गुन्हा घडल्यापासून तो पसार झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, फुरकान शेख, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, उमाकांत गावडे यांचे पथक ढोकणेचा शोध घेत होते. पथक नेवासा तालुक्यामध्ये त्याचा शोध घेत असताना निरीक्षक आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शरद ढोकणे हा माळीचिंचोरा या ठिकाणी येणार असुन तो कोठेतरी पळुन जाण्याच्या तयारीत आहे.

निरीक्षक आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करून त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. पथकाने नगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वडाळा ते माळीचिंचोरा दरम्यान सापळा लावून शरद ढोकणे याला ताब्यात घेत गजाआड केले. प्रवीण डहाळे खून प्रकरणी त्याच्याकडे विचारणा केली असता व एलसीबी पथकाने खाक्या दाखविताच तो पोपटा सारखा बोलू लागला. त्याने सदर गुन्ह्यात सहभागी असल्याची कबूली दिली आहे. त्याला पुढील तपासकामी नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई अधीक्षक ओला, अपर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक (शेवगाव विभाग) सुनील पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

परिसरात दहशत

शरद ढोकणे याची गोपाळपूर व परिसरातील गावांत दहशत होती. यापूर्वी त्याने अनेकांना आपल्या दहशतीच्या जिवावर धमकावले होते. डहाळे खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. टप्प्यात येताच त्याच्या मुसक्या आवळल्या आहे. त्याला अटक करण्यात आल्याने त्याच्या दहशतीला लगाम बसणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com