
गळनिंब |वार्ताहर|Galnimb
श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंबची ग्रामसभा सरपंच शिवाजी चिंधे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ग्रामस्थांना विविध विषयांवर चर्चा करायची होती परंतु गदारोळ झाल्याने ग्रामसभा आटोपती घ्यावी लागली.
ग्रामसेवक श्रीमती निर्मला तावरे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर विषय पत्रिकेवरील विषयाचे वाचन करून यामध्ये ग्राम स्वच्छता अभियान, मेरी मिट्टी मेरा देश, घरकुलाबाबतच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. विषयाचे वाचन चालू असताना अचानक उपसरपंच पती अण्णासाहेब मारकड यांनी घाईघाईने तंटामुक्ती अध्यक्षांचे नाव सुचविले त्याला ग्रा. पं. सदस्य प्रा. बाळासाहेब वडितके, केरूनाना शिंदे, राजेंद्र गवळी आदींनी आक्षेप घेतला. त्यांनी ग्रामसेविका श्रीमती तावरे यांना धारेवर धरले, ग्रामसेविका तावरे यांना प्रा. वडितके यांनी सांगितले की, तुम्हाला ऐनवेळच्या विषयामध्ये तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड करता येणार नाही.
विषयपत्रिकेवर तंटामुक्त अध्यक्ष निवडीचा विषय नाही. तुम्ही स्पष्टीकरण द्या. ग्रामसेविका श्रीमती तावरे यांनी ऐनवेळच्या विषयात निवड करता येते, असे म्हणताच प्रचंड मोठा गदारोळ झाला. त्यामध्ये बेकायदेशीरपणे तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे ग्रा.पं. सदस्य प्रा. बाळासाहेब वडितके, केरूनाना शिंदे, राजेंद्र गवळी म्हणाले.
या ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थांना आपले प्रश्न मांडायचे होते. यामध्ये गावातील वॉर्ड नं 3 मधील दिवे बर्याच दिवसांपासून बंद आहे. दलित वस्तीमधील नाल्यांचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे. पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार लिलाताई जोशी यांनी केली. रात्री दोन अडीच वाजता पिण्याचे पाणी सोडण्याची पद्धत कोणती असा सवालही त्यांनी सत्ताधार्यांना केला. सत्ताधार्यांच्या मनमानीमुळे ग्रामस्थांमध्ये तिव्र असंतोष आहे. या प्रश्नांवर निश्चितच वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या ग्रामसभेस प्रवरा बँकेचे माजी उपाध्यक्ष बापूसाहेब वडितके, बँकेचे माजी संचालक हनुमंत चिंधे, माजी उपसभापती अण्णासाहेब शिंदे, ग्रा.पं सदस्य संजय शिंदे, रवींद्र चिंधे, रामदास भोसले, साहेबराव भोसले, डॉ.सुनील चिंधे, संचालक राजेंद्र गवळी, इंद्रभान वडितके, नामदेव जाटे, कैलास मार्कड, सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव वडितके, संजय भोसले, अध्यक्ष बापू चिंधे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.