शासकीय, गायरान व ग्रामपंचायत जागेवर सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरच घरकुले देणार - खंडागळे

शासकीय, गायरान व ग्रामपंचायत जागेवर सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरच घरकुले देणार - खंडागळे

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

गेली अनेक वर्षे स्वमालकिच्या जागेवरुन प्रलंबीत असलेला घरकुलांचा प्रश्न आता शासन निर्णयामुळे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला असुन शासकिय गायरान व ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करुन राहणार्‍या पात्र लाभार्थ्यांचा राहत्या जागेवर घरकुल बांधुन देणार असल्याची माहीती टाकळीभानचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी दिली आहे.

श्री. खंडागळे म्हणाले कि, मौजे टाकळीभान येथील बर्‍याच वर्षापासून प्रलंबित असलेला घरकुलांचा प्रश्न महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभागाकडील दिनांक 22 ऑगष्ट 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुटणार आहे. यासाठी सर्वांसाठी घरे 2024 हे राज्य शासनाचे धोरण ग्रामपंचायत राबविणार असून प्रधानमंत्री आवास योजनेतील ब व ड यादीतील कच्या घरात राहणार्‍या पात्र लाभार्थ्यांनी गायरान व ग्रामपंचायत सरकारी जागा या ठिकाणी वास्तव्य करुन राहणार्‍या लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे.

यासाठी लाभार्थ्याची ग्रामपंचायत दप्तरी कच्च्या घराची नोंद असणे आवश्यक आहे. त्यानुसार पहिल्या 100 घरकुलांचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. तर उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्याटप्याने लवकरच घरे देण्यात येऊन त्यांच्या हक्काचे घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात येईल. डिसेंबर 2024 पर्यत एकही पात्र लाभार्थी घरापासून वंचित राहणार असा आराखडा टाकळीभान ग्रामपंचायतमार्फत करण्यात येत असुन पुढील आठ दहा दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या राहण्याच्या जागेचे स्थळ निरीक्षण करुन वस्तुस्थिती जाणुन घेतली जाईल. या सर्व घराचा मास्टर प्लॅन व आराखडा तयार करुन घरकुल योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी यावेळी सांगितले.

टाकळीभान येथील सरकारी गट नंबर 32, गट नंबर 95, गट नंबर 189, गट नंबर 245, गट नंबर 286, गट नंबर 287 या सरकारी गटातील जागेवर म्ठ्या प्रमाणात मानवी वसाहत बसलेली आहे. या गटातील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे लवकरच या सर्व सरकारी गटातील अतिक्रमणं कायम होऊन हे गट गावठाणाकडे वर्ग केले जाणार असल्याने या सर्व गटातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना राहत्या जागेवरच घरकुलचा लाभ देता येईल, अशी माहितीही उपसरपंच कान्हा खंडागळे यानी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com