गंगागिरी महाराजांच्या 173 व्या हरिनाम सप्ताहास आज प्रारंभ
सार्वमत

गंगागिरी महाराजांच्या 173 व्या हरिनाम सप्ताहास आज प्रारंभ

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

योगिराज सद्गुरू गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून श्रीक्षेत्र सराला बेटावर प्रारंभ होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने पार पडत असलेल्या या सप्ताहाची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे.

केवळ 50 जणांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने हा सप्ताह पार पडणार आहे. काल गुरुवारी तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी सप्ताहस्थळी भेट देऊन आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना सप्ताह समितीला दिल्या आहेत. या सप्ताहाला महाराज मंडळी, बेटावरील विद्यार्थी तसेच सप्ताह समितीचे सदस्य असा 50 जणांचा राबता राहणार आहे.

आज सकाळी 10 वाजता प्रहरा मंडपात विना आणि भजन महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते होणार आहे. अवघे दहा टाळकरी आलटून पालटून 24 तास अखंड भजन गाणार आहेत. दुपारी 1 ते 2 या वेळेत महंत रामगिरी महाराज बेटावरील व्यासपिठावरून प्रवचन देणार आहेत. तेथे छोटा मंडप उभारला आहे.

लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तैरने को लिनता, डुबने को अभिमान हे सप्ताहाचे ब्रिद आहे. योगिराज गंगागिरी महाराजांनी 173 वर्षांपूर्वी हा सप्ताह सुरू केला. या सप्ताहाची परंपरा कायम राहिली. ब्रम्हलिन नारायणगिरी महाराजांपासून या सप्ताहाला मोठी गर्दी होऊ लागली. आता महंत रामगिरी महाराजांच्या काळात या सप्ताहाने विविध रेकॉर्ड केले आहेत.

मात्र आज सुरू होणार्‍या या कोव्हिड 19 च्या पार्श्वभुमिवरील हा सप्ताह अडचणीत आला होता. परंपरा खंडित होते की काय? असे वाटत असतानाच हा सप्ताह छोटेखानी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र भाविकांना या सप्ताहाला उपस्थित राहता येणार नसले तरी त्यांना सोशल मीडिया, टिव्ही, वृत्तपत्र या माध्यमातून या सप्ताहाचा आस्वाद घेता येणार आहे.

प्रशासनाच्या सुचनेनुसार भाविक या सप्ताहास येऊ नयेत म्हणून श्रीरामपूरकडून बेटाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. चर खोदून तसेच पत्रे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. सप्ताहाचे सरळ प्रक्षेपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक व्हायरल करून तसेच फेसबुकवर लाईव्ह करण्यात येणार आहे. याशिवाय सप्ताहाच्या प्रवचनाचे साधना या वाहिनीवर सायंकाळी 6 ते 7 या कालावधीत प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com