भविष्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता

भविष्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता

उष्णतेच्या लाटेमुळे कांदा उत्पादनात कमालीची घट येणार

खैरी निमगाव | Khairi Nimgav

यंदाच्या वर्षी कांद्याची विक्रमी लागवड झाली. अडथळ्यांची शर्यत पार करून शेतकर्‍यांनी जोमदार पीक काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु महिन्याच्या प्रारंभी उष्णतेच्या लाटेमुळे आणि खराब वातावरणामुळे कांदा उत्पादनात कमालीची घट येणार आहे.

उन्हाळी कांदा उत्पादनात चालू वर्षी कांदा लागवड सरासरीपेक्षा अतिरिक्त झाली. अगदी जानेवारी अखेरपर्यंत कांदा लागवड सुरू होती. खास बाब म्हणजे नेहमीपेक्षा यावर्षी कांदा उत्पादनात असंख्य अडचणी आल्या. तसेच उत्पादन खर्च देखील कमालीचा वाढला. लागवडीच्या हंगामात बेमोसमी पाऊस झाल्याने लागवड लांबली. रोपांना बाधा झाली. एकाचवेळी लागवड हंगाम आल्याने मजुरांची मागणी वाढली. त्यामुळे नेहमीपेक्षा अतिरिक्त पैसे मोजून लागवड करावी लागली. त्यानंतर प्रकर्षाने गरज असतानाच रासायनिक खतांची भरमसाठ किंमत वाढ झाली. सुदैवाने यावेळी खतटंचाई भासली नाही.

समाधानाची बाब म्हणजे, थंडी चांगली राहिल्याने पीक जोमात आले. अतिरिक्त लागवड, त्यात पोषक हंगाम यामुळे यंदा बंपर उत्पादन येईल, असे अपेक्षित होते. मात्र अचानक उष्णतेची लाट निर्माण झाली. यामुळे कांदा पिकावर प्रतिकूल परिणाम होऊन पिकाची म्हणजे मालाची वाढ खुंटली. दुसरीकडे शेवटच्या टप्प्यात याच ढगाळ वातावरणामुळे विहिरींचे पाणीही झपाट्याने आटले. ठिकठिकाणच्या उत्पादकांना अर्ध्यावर पीक सोडून द्यावे लागले. या सर्व प्रतिकुलतेमुळे कांदा उत्पादन कमालीचे घटणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी या संकटाचा सामना करून क्वॉलिटी माल तयार करणार्‍या शेतकर्‍यांच्या कांद्याला लवकरच वाढीव दर मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वातावरणीय बदलामुळे जवळपास सरसकट सगळ्या उत्पादकांच्या सरासरी कांदा उत्पादनात मोठी घट येणार आहे. या दुर्धर परिस्थितीमुळे कांदा उत्पादक चिंताक्रांत असतानाच कांदा जास्त दिवस टिकणार की नाही ही शेतकर्‍यांची घालमेल वाढली आहे. उन्हाळी कांदा काढणीस सुरुवात झाली असून लाल कांद्याची आवक अधिक असल्याने बाजार भावात गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घसरण झाल्याचे चित्र आहे. वर्षातील एकमेव कांदा पिकाला वातावरणीय बदलाचे आणि उष्णतेचे ग्रहण लागल्याने अर्थव्यवस्थेला थेट हानी पोहोचत असून त्यामुळे बेमोसमी ढगांसोबत उत्पादकांच्या मनातही काळजीचे ढग दाटून आले आहेत.

Related Stories

No stories found.