‘ये मेरा दुल्हा नही है, ये कौनसी बॉडी लायी’

अंत्यविधीसाठी संगमनेरात आला भलताच मृतदेह !
‘ये मेरा दुल्हा नही है, ये कौनसी बॉडी लायी’

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

‘ये मेरा दुल्हा नही है, ये कौनसी बॉडी लायी है’ असा सवाल महिलेने करताच प्रशासनाची धावपळ उडाली. करोना आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अंत्यविधीसाठी संगमनेरात आणण्यात आला होता. मात्र हा आपला पती नाहीच असे महिलेने सांगितले. त्यामुळे संगमनेरात अंत्यविधीसाठी आपण भलताच मृतदेह आणल्याचे लक्षात आल्याने उपस्थितांची धावपळ उडाली. अखेर हा मृतदेह पुन्हा नगरला पाठविण्यात आला.

संगमनेर शहरातील मध्यवर्ती भागातील उपनगरात राहणार्‍या एका युवकाला करोना झाला होता. त्याला उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना दि.26 जुलै रोजी त्याचे निधन झाले. निधनाचे वृत्त समजताच मयत व्यक्तीचे मोजकेच नातलग नगर येथे गेले.

सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनाने मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. करोना आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या अंगावर वेगळा ड्रेस घालण्यात येतो. त्याचा चेहराही झाकून ठेवण्यात येतो. रुग्णाच्या नातेवाइकांनी त्याचा चेहरा न पाहताच मृतदेह ताब्यात घेतला. रुग्णवाहिकेतून मृतदेह संगमनेरला आणला.

मात्र समाजाच्या रितीनुसार पत्नीला पतीचा चेहरा दाखविण्यात येतो, याप्रमाणे सदर व्यक्तीचा चेहरा त्याच्या पत्नीला दाखवण्यात आला. हा चेहरा पाहताच तिला आश्चर्याचा धक्का बसला. हा आपल्या पतीचा मृतदेह नसल्याचे तिने सांगितल्याने उपस्थितांची धावपळ उडाली. मयत व्यक्तीच्या पत्नीनेच आमच्या प्रतिनिधीस ही ‘आपबिती’ कहाणी सांगितली. प्रशासनाने भलत्याच व्यक्तीचा मृतदेह ताब्यात दिलाच कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्याशी संपर्क साधला असता असा प्रकार घडलाच नसल्याचे सांगून त्यांनी कानावर हात ठेवले तर तहसीलदार अमोल निकम यांच्याशी संपर्क साधला असता असे घडू शकते का? असा प्रश्न करून तसे घडले असेल तर मी त्याची माहिती घेतो असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे नेमका प्रकार काय ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com