जामखेड l तालुका प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील चार वर्षापासून फरार असलेले सोनेगाव व घोडेगाव येथील राहणारे दोन आरोपीना पोलीसांनी सापळा रचून अटक केली.

मागील काही दिवसांपासून फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मोहीम जामखेड पोलीसांची चालू आहे. त्यानुसार जामखेड तालुक्यातील आत्तापर्यंत एकुण १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जगन्नाथ येडबा जाधव (रा. सोनेगाव ता. जामखेड) तसेच खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील फरार आरोपी बाळू शिवाजी रावण (रा. घोडेगाव ता. जामखेड) हे खर्डा परिसरात आले आहेत. अशी माहिती मिळाल्यावरून तात्काळ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी खर्डा दूरक्षेत्र येथील पोलीस अंमलदार पोना शेंडे, पो.कॉ साखरे व मस्के यांना सूचना देऊन रवाना केले. पोलीसांनी शिताफीने फरार आरोपी खर्डा गावचे शिवारातून ताब्यात घेऊन आरोपीस अटक केली. आरोपीचे जगन्नाथ येडबा जाधव याच्या विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. व सदर आरोपी चार वर्षापासून फरार झालेला होता. तसेच आरोपी बाळू शिवाजी रावण याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून तो गेल्या दोन वर्षापासून फरार होता. दोन्ही गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आलेली असून पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे व पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात करीत आहेत.