मशागतीचे दर वाढले तर शेतमालाचे दर पडले

इंधन दरवाढीचा फटका, शेतकर्‍यांना नकोसे झाले अच्छे दिन
मशागतीचे दर वाढले तर शेतमालाचे दर पडले

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

पेट्रोल डीझलचे भाव प्रतिलिटर शंभरी पार गेले आहेत. या वाढत्या इंधन दरवाढीचा फटका शेतकर्‍यांना बसला असून शेती मशागतीचे दर 400 ते 500 रुपयांनी वाढले आहेत. वाढलेले खत व मशागतीचे दर, हरबरा कांदा पिकाचे पडलेले भाव, वेळेत न तुटलेले ऊस या दृष्टचक्रामुळे शेतकरी पुरता भरडला असून शेती क्षेत्रातील हे अच्छे दिन शेतकर्‍यांना नकोशे झाल्याचे चित्र आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतकर्‍याकडे पाहिले जाते. मात्र वाढत्या महागाईचा विशेषतः इंधन दरवाढीचा फटका बसल्याने जगाचा पोषिंदा असलेला शेतकरी राजा पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. अल्प भू-धारक शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. शेतजमीन कमी असल्याने प्रत्येक शेतकरी स्वतःचा ट्रॅक्टर घेवू शकत नसल्याने इतरांकडून मोलमजुरीने शेती कामे करून घ्यावी लागतात.

मात्र वाढत्या इंधन दरवाढीमुळे शेतीमधील नांगरणीच्या दरात एकरी पाचशे रूपयांची वाढ झाली आहे. नांगरणीबरोबरच येत्या काळात पेरणीसह इतर शेती कामाचेही दर वाढणार आहे.प्रचंड वाढलेले खतांचे दर, शेती मशागतीचे वाढलेले दर याचा थेट फटका शेतकर्‍यांना बसत आहे.तर दुसरीकडे कांदा व हरबर्‍यासारख्या शेती पिंकांचे पडलेले भाव, वेळेत ऊस न तुटल्याने झालेले नुकसान यामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. शेती क्षेत्रातील हे ‘अच्छे दिन’ शेतकर्‍यांना नकोशे झाल्याचे चित्र आहे.

कांद्याने केला वांदा तर उसाने जिरवली

मान्सूनच्या पावसाने गेल्या वर्षी साथ दिली. पाणी असल्यामुळे शेतकर्‍यांचा उत्साह वाढला.खरीप रब्बी बरोबर उसाच्या लागावडी वाढल्या. पिकेही चांगली आली. ऐन काढणीला कांद्याचे भाव पडल्याने कांद्याने वांदा केला तर ऊस वेळेत न तुटल्याने शेतकर्‍यांची जिरली. त्यामुळे मोठा अर्थिक फटकाही बसला.

रासायनिक खतांच्या दरात मोठी दरवाढ

शेती पिकांसाठी अत्यंत उपयुक्त असणार्‍या रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ही दरवाढ शेती उद्योगाला उद्ध्वस्त करणारी ठरणार असल्याची भीती सध्या शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.