इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अकोलेत काँग्रेसची भव्य रॅली

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अकोलेत काँग्रेसची भव्य रॅली

अकोले (प्रतिनिधी) / akole - महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून मोदी सरकारने इंधन दरवाढ कमी करावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत जाणार असून त्यांच्यात जनजागृती करून मोदी सरकारचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी दिला.

केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, गॅस इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अकोले तालुका काँग्रेस च्यावतीने अकोले मध्ये ढोल ताशाच्या गजरात महात्मा फुले चौक ते अकोले बस स्थानकापर्यंत भव्य सायकल, बैलगाडी, हातगाडी रॅली काढण्यात आली. त्यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे बोलत होते.

रॅलीत ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, तालुकाध्यक्ष दादपाटील वाकचौरे, ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, सोन्याबापू वाकचौरे, महिला काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस उत्कर्षाताई रुपवते, रमेशराव जगताप, बाळासाहेब नाईकवाडी, शिवाजी नेहे, ज्ञानेश्‍वर झडे, मदन पथवे, भास्कर दराडे, अमोल नाईकवाडी, अरीफ तांबोळी, संपतराव कानवडे, विक्रम नवले, रामदास धुमाळ, सुजित नवले, साईनाथ नवले, सचिन जगताप, संदीप पवार, उबेद शेख, सतीश पाचपुते, मंदाताई नवले, शोभाताई निर्गुडे, स्वाती नवले, राधिका नवले, वनिता शेटे, जया झोळेकर, रुपाली पाचपुते, संगीता सापीके आदींसह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.डॉ.सुधीर तांबे यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. मोदी सरकारने देशाची बिकट अवस्था करून ठेवली आहे. मोदी हे हुकूमशाही पध्दतीने देश चालवीत असून त्यांचात अहंभाव निर्माण झाला आहे. शेतकरी 8 महिन्यापासून आंदोलन करीत आहे मात्र मोदींना त्यांना भेटायला वेळ नाही. महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य माणूस होरपळून निघाला आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून पक्षाची जबाबदारी म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत जाणार असून त्यांच्यात जनजागृती करून मोदी सरकारचा भांडाफोड करणार असल्याचे डॉ. तांबे म्हणाले.

ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले म्हणाले की, हा समाज सरकारवर अवलंबून असून त्यांची उन्नती करणे हे सरकारचे काम आहे, त्यामुळे देशात स्वामीनाथन आयोग लागू करावा व शेतीमालाला हमीभाव द्यावा. मोदी सरकारच्या गेल्या सात वर्षाच्या काळात 375 वेळा इंधन दरवाढ झाली आहे. मोदी सरकारने इंधन दर वाढ करून नफेखोरी करून स्वतःची तिजोरी भरली आहे. ही समाजाची लूट असून हा मोठा देशद्रोह असल्याची घणाघाती टीका केली.

यावेळी तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, जेष्ठ नेते मिनानाथ पांडे, अमोल नाईकवाडी, शोभाताई निर्गुडे, मंदाबाई नवले, सौ.स्वाती नवले या महिलांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

नायब तहसीलदार महाले यांना महिलांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

कुरिअरने शेणाच्या गोवर्‍या पाठविणार -

गॅस दरवाढ ही प्रत्येक घराशी निगडित असून इंधन भाव वाढीमुळे सर्व सामान्य माणसाने कसे जगायचे.महिलांना घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे असे प्रदेश सरचिटणीस उत्कर्षाताई रुपवते यांनी सांगितले. मोर्चानंतर महिलांच्या भावना मोदी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी महिलांच्या वतीने मोदी सरकारला शेणाच्या गोवर्‍या कुरियरने पाठविल्या जाणार असल्याचे रुपवते यांनी सगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com