एफआरपी पेक्षा जास्त दर देण्याची काळे कारखान्याची परंपरा कायम - ना. काळे

दुसरा हप्ता 100 रुपये दहा दिवसात शेतकर्‍यांच्या खात्यावर ; 67 व्या गळीत हंगामाची सांगता
एफआरपी पेक्षा जास्त दर देण्याची काळे कारखान्याची परंपरा कायम - ना. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना नेहमीच एफआरपी पेक्षा जास्त दर देण्याची परंपरा या गळीत हंगामात देखील अखंडपणे सुरु ठेवली आहे. चालू वर्षीची एफआरपी 10 टक्के उतार्‍यासाठी ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता 2206.78 रुपये प्र.मे.टन येत असली तरी गळीतास आलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना यापूर्वी प्र.मे.टन 2500 प्रमाणे रक्कम अदा केलेली आहे.

एफ आर. पी पेक्षा जादा दर देण्याची आपली परंपरा असल्यामुळे चालू वर्षीच्या गळीतास आलेल्या ऊसाला अधिक 100 रुपये प्र.मे. टन दुसरा हफ्ता देणार असून हि रक्कम येत्या 10 दिवसाच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन तथा श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिली.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 67 व्या गळीत हंगामाची सांगता मा. आ. अशोकराव काळे यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक विश्वासराव आहेर व त्यांच्या पत्नी राजनंदा आहेर यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करून करण्यात आली.

यावेळी आशुतोष काळे म्हणाले, कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हित साधण्याच्या आदर्श विचारांवर माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मागील दोन वर्ष चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे चालू वर्षीचा हंगाम हा अतिरिक्त ऊस उपलब्धतेचा हंगाम ठरला. 213 दिवस चाललेल्या गळीत हंगामात 7 लाख 97 हजार 687 मे. टन ऊसाचे गाळप झाले असून 8 लाख 77 हजार 500 क्विंटल साखर पोती उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा 11 टक्के मिळाला आहे.

कारखान्याकडे सुरवातीला 10 हजार 500 हेक्टर ऊस नोंद झालेली होती यातुन 500 हेक्टर बेणे, चारा वापर इत्यादी वजा जाता 70 मेट्रिक टन प्रति हेक्टरी प्रमाणे एकूण 7 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल असा अंदाज होता. त्यामुळे गेटकेन सेंटर वरून ऊस नोंदी घेतल्या नाही. सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेवून कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाला प्राधान्य दिले त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस गाळपा अभावी उभा राहिला नाही.

चालू हंगामात जागतिक स्तरावर जवळपास 40 ते 60 लाख मेट्रिक टन साखरेचा तुटवडा निर्माण झाला. तसेच रशिया व युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे इथेनॉल निर्मिती कडे सर्व देशांचा कल वाढला. याचा परिणाम जागतिक स्तरावर साखरेचा दर वाढण्यात झाला. देशाला साखर निर्यातीचा मोठी संधी प्राप्त झाली या संधीचा देशातील संपूर्ण साखर कारखानदारी लाभ घेत आहे. आपल्या कारखान्याने देखील या संधीचा लाभ घेतला असून 19 मार्च पासून कच्ची साखर तयार करण्यास प्रारंभ केला. टप्प्याटप्प्याने कच्च्या साखरेचे निर्यातीचे सौदे करून एकूण 2 लाख 79 हजार क्विंटल साखर निर्यात करण्याची करार करून आज अखेर प्रत्यक्षात 2 लाख 33 हजार क्विंटल कच्ची साखर डिस्पॅच झाली आहे. असेही ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अनिल शिंदे, स्नेहलता शिंदे, उपाध्यक्ष सुधाकर रोहम, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, ज्ञानेश्वर आभाळे, बी.बी.सय्यद, एस.डी. शिरसाठ, तसेच सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी केले तर आभार संचालक बाळासाहेब बारहाते यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com