विना कपात एफआरपीसाठी शेतकरी संघटना आणि प्रशासनाची उद्या बैठक

विना कपात एफआरपीसाठी शेतकरी संघटना आणि प्रशासनाची उद्या बैठक

नगरचे जिल्हाधिकारी यांच्यासह सहसंचालक साखर राहणार उपस्थित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 2021-2022 च्या गाळप हंगामासाठी 2 हजार 900 रुपये विनाकपात एफआरपी मिळावी यासाठी उद्या (मंगळवारी) नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी, प्रादेशिक सहसंचालक साखर आणि शेतकरी संघटना यांच्या बैठक होणार आहे.

2021-22 च्या गाळप हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना केंद्र सरकारने जाहीर केलेला 31 ऑगस्ट 2021 चे परिपत्रकानुसार 2 हजार 900 रुपये 10 टक्के रिकव्हरीसाठी पहिला हप्ता विनाकपात मिळावा, त्यामधून कोणतीही बँक अथवा विद्युत बिलाच्या कपाती करू नयेत, तसेच साखर कारखान्यांच्या वजन काटे यांच्या संदर्भातील शेतकर्‍यांच्या तक्रारी, भरारी पथकाची नेमणूक करणेे, तसेच अनेक साखर कारखान्यांमध्ये रिकव्हरी चोरीचा प्रश्न गंभीर असून ऑनलाईन बँगींग व टॅगींगबाबत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे.

मात्र, त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच वजन काट्यांच्या काटेमारी संदर्भामध्ये देखील पत्रव्यवहार केलेला असून शासन प्रशासनाकडून वारंवार दिरंगाई केली जात आहे. 15 ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांचे गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन हप्त्यांमध्ये साखर कारखान्याने अद्यापही पहिला हप्ता एफआरपीचा दिलेला नाही. त्यामुळे साखर कारखान्यांना 15 टक्के व्याजाचा दर लागू होतो. शेतकर्‍यांना 2 हजार 900 रुपये प्रत्येक टन विनाकपात एफआरपी आणि अधिक 15 टक्के व्याज अशा रकमा मिळाव्यात, अशी मागणी बैठकीत करण्यात येणार आहे.

अनेक सहकारी, खाजगी साखर कारखान्यांनी मागील काही वर्षांमध्ये देणी, एफआरपी बिले, आरएसएफ रकमा थकवलेल्या आहेत. त्यादेखील मिळणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या अधिपत्याखालील आरआरसीची कारवाई वेळेत न झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत असून त्याला सरकार जबाबदार आहे, असा आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार-राजे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com