खाऊच्या पैशातून ईश्‍वरीने केली राख्यांची निर्मिती
सार्वमत

खाऊच्या पैशातून ईश्‍वरीने केली राख्यांची निर्मिती

राख्यांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम करोना योद्धयांना समर्पित करणार

Dnyanesh Dudhade

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

विणूया बंध आपुलकीच्या नात्यांचे...ठेवूनि भान सामाजिक जाणिवांचे...देऊनि हात हाती सहकार्याचे..होऊया करोना वीर भारतमातेचे...ही संकल्पना उराशी ठेवून नगरमधील ईश्‍वरी तांबे या विद्यार्थीने खाऊच्या (जमविलेल्या) पैशातून राखी निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि तयार होणार्‍या राख्यांच्या विक्रीतून जमा होणारा पैसा करोना योध्दयांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या आठवड्यात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ईश्‍वरीने रक्षाबंधन सणाच्या पार्श्‍वभूमीवर राखी निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी काही महिन्यांपासून घरातून तिला मिळालेले पैसे तिने साठवून ठवले होते. या पैशातून सहजासहज उपलब्ध होणारे राखी तयार करण्याचे साहित्य तिने विकत घेतले. त्यातून राख्या तयार करून त्यातून उभा राहणारा निधी जिल्हा प्रशासनामार्फत कोविड योध्दयांना देण्याचा तिन्हे निर्णय घेतला. ईश्‍वरीची घरची परिस्थिती उत्तम आहे. आई-वडील प्राथमिक शिक्षक आहेत. आजोबा राज्य बँकेतून बड्या हुद्यावरून सेवानिवृत्त आहेत. घरी सर्व सुखसोई असतांना आपल्याला देखील समाजाचे काही देणे लागत असल्याच्या भावनेतून तिने राख्या तयार करून त्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. या कामी तिला घरातून मोठा प्रतिसाद मिळाला. ईश्‍वरीच्या आई-वडीलांनी मुलींच्या संकल्पनेला त्यांच्या संपर्काची जोड दिली आणि सोशल मीडियावर राखी विक्रीसाठी आव्हान केले. यामुळे ईश्‍वरीच्या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. येत्या रक्षाबंधनानंतर राखी विक्रतीतून संकलित होणारी रक्कम ही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्फत कोविड योध्दयांसाठी जिल्हा प्रशासनाकडे जमा करणार आहे.

भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन सणाचे खुप मोठे महत्त्व आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे बंधन राखीच्या माध्यमातून व्यक्त करतो. मी माझ्या जमवलेल्या पैशातून राख्या तयार करण्याचे साहित्य विकत घेतले आहे. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक सुंदर राख्या तयार असून या राख्या विक्रीतून येणारे सर्व पैसे मी कोरोना विरुद्धच्या लढाईत समर्पित करणार आहे. माझी प्रांजळ भावना समजून घेऊन आत्तापर्यंत मला शंभरहून राख्यांची ऑर्डर मिळाली आहेत. आपण ही या उपक्रमात सहभागी व्हावे. तुमच्या छोट्या ताईच्या भावनिक हाकेला ओ द्यावी.

ईश्‍वरी संतोष तांबे, अहमदनगर

Deshdoot
www.deshdoot.com