संगमनेरच्या कारागृहात जुन्या कैद्यांकडून नवीन कैद्यांशी रॅगिंग,पोलिसांनाही दमबाजी

पोलिसांकडून दुर्लक्ष
संगमनेरच्या कारागृहात जुन्या कैद्यांकडून 
नवीन कैद्यांशी रॅगिंग,पोलिसांनाही दमबाजी

संगमनेर (शहर प्रतिनिधी) - महाविद्यालयात रॅगिंगच्या घटना अनेकदा घडतात. महाविद्यालयात घडणारा हा प्रकार आता संगमनेरच्या कारागृहातही होत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. या कारागृहातील जुने कैदी नवीन कैद्यांना वेगवेगळे कामे सांगत असून असे काम न करणार्‍या कैद्यांना मारहाण करत असल्याचे प्रकार घडत असून पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारी कैद्यांसाठी कारागृह बांधण्यात आलेले आहे. या कारागृहात तीन बराकी असून यामध्ये 24 कैद्यांची क्षमता आहे. अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक कैदी या कारागृहात ठेवण्यात येतात. वेगवेगळ्या गुन्ह्यातील कच्चे कैदी या कारागृहात ठेवण्यात येतात. कारागृह मध्ये काही कैदी जुने आहेत हे कैदी कारागृहात नव्याने दाखल होणार्‍या कैद्यांचा मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचे वृत्त आहे. आम्ही सांगू ते काम नवीन कैद्याने केले पाहिजे असा अट्टाहास जुन्या कैद्यांचा असतो. भांडी घासणे, शौचालय साफ करणे असे काम नवीन कैद्यांना सांगण्यात येते. हे काम न करणार्‍या कैद्यांना मारहाण केली जात आहे.

काही दिवसापूर्वी या कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. कैद्यांच्या हाणामारीकडे पोलीस व तुरुंग अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे येथील येरवडा कारागृहामध्ये काही कैद्यांना हलविण्यात आले होते मात्र करोनाचे कारण सांगून येरवडा कारागृहाच्या प्रशासनाने या कैद्यांना पुन्हा संगमनेर येथे पाठविले होते. संगमनेरच्या कारागृहात असलेल्या कैद्यांना जेवणाचे डबे, तंबाखू पुड्या, गुुटखा सहज मिळत असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शी सांगतात.

या कारागृहात पोलिस बंदोबस्त असतानाही बाहेरच्या वस्तू कारागृहात जातात कशा? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या कठोर भूमिकेमुळे कारागृहाला बर्‍यापैकी शिस्त लागली. बाहेरील लोकांंना सहज प्रवेश कारागृहात मिळत नव्हता आता मात्र परिस्थिती बदलली आहे. कुणाच्या आशीर्वादामुळे या कैद्यांना सुविधा मिळत आहेत व कारागृहात हाणामार्‍या होत असताना पोलीस अधिकारी का दुर्लक्ष करतात? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

पोलिसांनाही दमबाजी

संगमनेर कारागृहातील जुने कैदी नवीन कैद्यांना दमबाजी व मारहाण करत असताना त्यांची मजल आता पोलिसांना दमबाजी करण्यापर्यंत पोहोचली आहे. तुरुंगाच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसांना काही जुने कैदी अनेकदा दमबाजी करत आहे. त्यांच्या मनाप्रमाणे वागले नाहीतर बाहेर आल्यावर पाहून घेऊ अशा भाषेत ते पोलिसांना धमकावतात असे असतानाही तुरुंग अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कैदी व त्यांच्या नातेवाईकांकडून मिळणार्‍या लाभामुळे या कैद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com