
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
खरेदीच्या व्यवहारात अपहार करून दोन ट्रकची मध्य प्रदेशात विक्री करणार्या टोळीतील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातून दोन ट्रक हस्तगत करण्यात आले आहेत. तोफखाना पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
गहिनीनाथ किसन दरेकर यांच्या मालकीचा अशोक लेलंड कंपनीचा इकोमेट मॉडेलचा ट्रक (एमएच 16 सीसी 3346) हा नाशिक येथील संजय शामसिंग परदेशी (सिडको), समशेर शाहिद अली सय्यद (नाशिक), अझहर हुसेन शेख (इंदिरानगर) यांना विकला होता. या ट्रकवरील 14 लाखांचे कर्ज भरण्याचे ठरले होते. त्यांनी कर्जाची परतफेड न करता ट्रकची मध्यप्रदेशात विक्री केली. दरेकर यांनी 31 डिसेंबर 2022 रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रिजवान फिरोज खान (वय 28, रा. नाईकवाडीपुरा, नाशिक) याला अटक केली.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, ट्रक मध्यप्रदेशातील भुपेंद्रसिंग याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने मध्यप्रदेशात जाऊन ट्रक (एमएच 16 सीसी 3346) आणि ट्रक (एमएच 17 बीवाय 2857) असे 36 लाख रूपये किंमतीचे दोन ट्रक हस्तगत केले आहेत. पोलिस अंमलदार दत्तात्रय जपे, सुरज वाबळे, सुनील शिरसाठ, वसिम पठाण, सतीश त्रिभुवन, अविनाश वाकचौरे, सचिन जगताप, गौतम सातपुते, दत्तात्रय कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.