मिटर रिडींगमध्येही वीज वितरण कंपनीची फसवणूक; अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष

मिटर रिडींगमध्येही वीज वितरण कंपनीची फसवणूक; अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष

संगमनेर (शहर प्रतिनिधी)

वीज वितरण कंपनीच्या संगमनेर विभागाअंतर्गत सुमारे ४० हजार विजेचे मीटर आहेत. मिटर रिडींग घेणारे दर महिन्याला अवघ्या तीस हजार मीटरचे रीडिंग घेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. संबंधितांना एका मीटरचे रीडिंग मागे सहा रुपये मिळतात. सगळ्या मीटरची रिडींग न घेताही वीज वितरण कंपनीकडून पूर्ण मीटर रीडिंगचे पैसे घेऊन वीज वितरण कंपनीची आर्थिक फसवणूक केली जात आहे. असे असतानाही संगमनेरच्या स्थानिक अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

वेगवेगळ्या सावळ्या गोंधळामुळे संगमनेरचे वीज वितरण कंपनीचे कार्यालय वादग्रस्त ठरले आहे. कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे होत असलेला आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. वीज वितरण कंपनीच्या संगमनेर विभागा अंतर्गत ४० हजार मीटरचा समावेश होतो. म्हणजे या कार्यालया अंतर्गत तब्बल ४० हजार ग्राहक वीज वितरण कंपनीशी जोडले गेले आहे. दर महिन्याला या मीटरचे रीडिंग घेणे संबंधितांवर बंधनकारक आहे. मीटर रीडिंग घेण्यासाठी संबंधितांना प्रत्येक मीटर मागे सहा रुपये मिळतात. यामुळे सगळ्या मीटरची रिडींग घेऊन ग्राहकांना योग्य बिल मिळावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. मात्र मीटर रीडिंग घेणारे ४० हजार ग्राहकांपर्यंत पोहोचू शकत नाही. दर महिन्याला ते अवघ्या ३० हजार मिटरचे रिडींग घेतात. १० हजार मीटर पर्यंत संबंधित कर्मचारी पोहोचू शकत नाही. यामुळे संबंधित ग्राहकाला चुकीचे विज बिल दिले जाते.

संगमनेर विभागातील सर्व ४० हजार मीटरचे रीडिंग न घेता ही संबंधित ठेकेदार वीज वितरण कंपनीकडे ४० मीटरचे रीडिंग घेतल्याचे दाखवतात. दहा हजार मीटरचे-सहा रुपये प्रमाणे दर महिन्याला सुमारे ६० हजार रुपयांची वीज वितरण कंपनीची फसवणूक केली जात असल्याची चर्चा आहे. याबाबत संगमनेर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कल्पना असतानाही ते मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनीची अशा पद्धतीने आर्थिक फसवणूक केली जात आहे.

वीज वितरण कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून काही जणांकडून मोठा आर्थिक फायदा मिळवला होता. तात्पुरत्या स्वरूपात काही ना नोकऱ्या देण्यात आल्या मात्र नंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली. 'तेलही गेले आणि तूपही गेले' अशी अवस्था या कर्मचाऱ्यांची झाल्याने त्यांच्यामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संगमनेर येथील वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com