माळवाडगाव (वार्ताहर) -

श्रीरामपूर तालुक्यातील किराणा व भुसार आडत व्यापारी मुथ्था बंधूनी माळवाडगांव पंचक्रोशीतील शेतकर्यांची कोट्यावधी रुपयांची देणी बुडवून

पोबारा करून काल 6 मार्चला एक महिना पुर्ण झाला. पोलीस तपासात अद्याप ठोस धागेदोरे देखील हाताला न लागल्याने संतप्त पिडीत शेतकरी संघर्ष कृतिसमिती शेतकर्यांनी बैठक घेऊन मुथ्था परिवाराचे फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध करून माहिती देणार्यास पाच लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

माळवाडगांव येथे वीस वर्षांपूर्वी अंगावरच्या कपड्यावर आलेल्या रमेश रामलाल मुथ्था व गणेश (मुन्ना) रामलाल मुथ्था, भूषण रमेश मुथ्था, चंदन रमेश मुथ्था हे चौघे बायका मुलांसह महिन्यापुर्वी दि. 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गावाला झोपेत ठेवून पसार झाले.

माळवाडगांवसह पंचक्रोशीतील गावातील हजारो शेतकर्यांचे 25 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र, अंबिका महिला पतसंस्था, धुळे सोयाबीन मील, श्रीरामपूरातील भिसी चालकांसह, किराणा, भुसार व्यापारी मिळून एकूण 40 कोटी रुपयांची बुडवणुक करून इमारत, कार, टेम्पो, पिकअप जागेवर सोडून पलायन केले.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसुद खान यांचे पथक औरंगाबाद, जालना, मालेगांव, इथे तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे यांच्या पथकाने मुंबई, ठाणे, टिटवाळा येथे जाऊन तपास केला. या तपासात काहीही ठोस पुरावे धागेदोरे हाताला लागलेले नसले तरी

टिटवाळा येथे मुन्ना मुथ्था याची मोटारसायकल मेहुण्याकडे आढळून आल्याने त्यास पथकाने तपासकामी ताब्यात घेऊन बरोबर आणले होते. मुथ्था परिवाराने पळून जाण्याचे दिवशी या मेहुण्याची लोणी, संगमनेरपर्यत मदत घेतली. पळून चाललो अशी यत्किंचितही कल्पना येऊ न देता मोटारसायकल माझ्या ताब्यात देऊन ईक्को कारमधून मलाही चकवा देऊन कोणत्या शहराकडे पोबारा केला हे सांगता येत नाही. या जबाबानंतर तालुका पोलिसांनी टिटवाळ्याचे पाहुण्यांस सोडून दिले.

मुथ्था परिवाराचे सर्व मोबाईल स्वीच ऑफ असले तरी एक मोबाईल काही दिवस सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी एक महिन्याचे कॉल रेकॉर्ड काढल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी करत असून, याव्यतिरिक्त कार, वाहने मुख्य दुकानासह, घर गोडावूनमधून लंपास झालेल्या मालाचा तपास तालुका पोलिसांनी या आठवड्यात जोमाने सुरू केला आहे.

आज तब्बल एक महिना पुर्ण झाल्याने पोलीस पथकास मदत करणारे कार्यकर्त्यांसह पिडीत शेतकर्यांनी बैठक घेऊन मुथ्था परिवाराचा ठावठिकाणा सांगणार्या व्यक्तीचे नांव गोपनीय ठेवण्यात येऊन माहिती देणार्यास कोट्यावधी रुपयांचे घेणे असलेल्या पिडीत शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने हे पाच लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.