
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील दिघी ग्रामपंचायतमध्ये 14 व्या वित्त आयोगाचे निधी मध्ये 18 लाख 33 हजार 500रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत नेवासा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नवनाथ देवराय पाखरे (वय 55) रा.नेवासा फाटा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 20 डिसेंबर 2021 रोजी गटविकास अधिकारी यांनी मौजे दिघी ता. नेवासा येथील 14 वा वित्त आयोग निधीमधील पैशाची चौकशीचे आदेश दिल्यावरुन उपलब्ध लेख्यांची तपासणी, पाहणी करुन अपहारीत रक्कम रुपये 18 लाख 33 हजार 500 बाबतचा चौकशी अहवाल सादर केला.
चौकशी मध्ये असे दिसून आले की, दिघी ग्रामपंचायत तत्कालीन ग्रामसेवक महादेव मल्हारी ढाकणे व तत्कालीन सरपंच आशाबाई नंदू भक्त या दोघांनी संगमताने 14 व्या वित्त आयोगातील दिघी ग्रामपंचायतीसाठी प्राप्त निधीचा 18 लाख 33 हजार 500 रुपयांचा वरील प्रमाणे असलेले खोटी कामे दाखवून व त्या कामांचे खोटे दस्तऐवज तयार करून अपहार केलेला आहे. म्हणून माझी तत्कालीन ग्रामसेवक महादेव मल्हारी ढाकणे व तत्कालीन सरपंच आशाबाई नंदु भक्त या दोघांविरुध्द कायदेशीर तक्रार आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 493/2023 भारतीय दंड विधान कलम 420, 409, 465, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.