
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
लग्न जमवून साखरपुडा झाल्यानंतर मुलाने व नातेवाईकांनी जमलेले लग्न मोडून मुलीची व तीच्या आई-वडिलांची फसवणूक केल्याची घटना तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी मुलगा, त्याचे आई-वडील व मामा या चौघाविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील सुसरे येथील एका शेतकर्याच्या मुलीचे लग्न तालुक्यातील केळवंडी येथील मुलाशी जमले. मुलीच्या वडिलांनी धुमधडाक्यात साखरपुडा केला.साखरपुड्याला दोन्ही कडील नातेवाईक व मध्यस्थ उपस्थित होते. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मुलीच्या वडिलांनी चार लाखाचा खर्च केला.त्यानंतर काही दिवसांनी मुलाचे वडील व मुलाचा मामा व मध्यस्थांनी मुलीच्या वडिलांना बोलून घेतले.
मुलाचे वडील व मामाने सांगितले की मुलगा लग्नास तयार नाही.लग्नाची आम्ही पूर्ण तयारी केली आहे त्यासाठी दीड लाख आतापर्यंत खर्च झाला आहे. असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. नातेवाईकांनाही समजावून सांगितले मात्र कुणीही ऐकून घेतले नाही. मुलाला फोन करून विचारले असता त्यानेही लग्न करणार नसल्याचे सांगितले. याबाबत मुलीच्या वडिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.