अफरातफर करणार्‍याचा जामीन फेटाळला

जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश
अफरातफर करणार्‍याचा जामीन फेटाळला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कंपनीतील मालाची अफरातफर करणारा कामगार आरोपी सागर मोहन तुपे (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश पी.व्ही. चतुर यांनी फेटाळला आहे.

दर्शन ब्रिजलाल सोनी(रा. आयरिश हॉटेल मागे, बुरुडगाव रस्ता) यांची एमआयडीसीमधील विवेक पॉली प्रॉडक्ट ही कंपनी आहे. सागर कंपनीच्या गोडावूनमध्ये लेखापाल म्हणून काम करत होता. कंपनी मालक सोनी यांना तयार माल व शिल्लक माल यामध्ये तफावत आढळून आली. त्यांनी बाबत तुपे यास जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. त्यांना संशय आल्याने कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात मालाचा अपहार झाल्याचे दिसून आले.

ऑर्डरपेक्षा जास्त वस्तूचे डाग ट्रकमध्ये टाकल्याचे दिसून आले. प्राथमिक तपासणीमध्ये एक लाख 72 हजारांची फसवणूक झाल्याचे आढळून आले. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी सागर तुपे याच्याविरुद्ध विश्वासघात करणे, फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. तुपे याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मूळ फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. अंकिता सुद्रिक यांनी बाजू मांडली. आरोपीविरुद्ध सीसीटीव्ही रेकॉर्डींगचे ठोस पुरावे आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. अ‍ॅड. राऊत यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com