
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
येथील मोची गल्लीत विक्रीस निघालेल्या तीन गाळ्याचे नोव्हेंबर, 2014 मध्ये साठेखत करून पाच लाख रुपये घेऊन सुमारे आठ वर्षे खरेदी देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी व्यावसायिक हरिभाऊ बाबुराव डोळसे (वय 62 रा. जुना बाजार, नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुरलीधर मोरन्दमल लुल्ला (वय 58 रा. सदर बाजार, भिंगार) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिभाऊ डोळसे यांचे मोची गल्ली येथे कापड दुकान आहे. दुकानाचे शेजारी कल्पतरू शॉपिंग आर्केट बी विंग अपार्टमेंन्टमध्ये तीन गाळे आहेत. मुरलीधर लुल्ला याने हे गाळे विक्री करण्याकरीता काढले असल्याने डोळसे यांनी तीन गाळे एकुण एक कोटी रुपयांस घेण्यासाठी तयार झाले. दोघांमध्ये चंद्रकांत मुथा यांनी व्यवहार व्हावा म्हणून भेट घालून दिली व ओळख करून दिली होती. 25 नोव्हेंबर 2014 रोजी डोळसे व लुल्ला यांनी अॅड. विजय मुनोत (बारातोटी कारंजा) यांच्याकडे या तिन्ही गाळ्यांचे साठेखत केले होते.
त्यामध्ये सहा महिन्यांनंतर व्यवहार झालेली रक्कम व वरिल मिळकतीची खरेदी करून देईल, असे 100 रुपयांच्या बॉन्डवर लुल्ला यांनी प्रतिज्ञा पत्र लिहून दिले होते. त्यावेळी डोळसे यांनी त्याला हातोहात दोन लाख रुपये रोख दिले व स्टेट बँक ऑफ इंडियाचा तीन लाखांचा चेक, असे एकूण पाच लाख रुपये दिले होते. हा व्यवहार चंद्रकांत हरदचंद मुथा (रा. गंजबाजार) व अशोक गदादे (रा. सावेडी) यांचे समक्ष झाला होता.
डोळसे यांनी दिलेला चेक वटलेला असून लुल्ला यांनी ते पैसे काढून घेतले होते. दरम्यान लुल्ला यांचे भाऊ किशोर लुल्ला यांनी 16 एप्रिल 2015 साली एका वृत्तपत्रात जाहीर नोटीस दिली की, मोची गल्लीतील कल्पतरू कॉम्प्लेक्समधील शॉप नं.5,6,7 ब्युटी पॅलेस ह्या दुकानाचा व्यवहार चालू आहे. तरी मेहेरबानी करून हा कोणीही व्यवहार करू नये. या जागेबाबत दिवानी न्यायालयात वाद चालू आहेत. हा व्यवहार कोणी केल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. व्यवहार करणारा हा स्वतः जबाबदार राहील, अशी नोटीस प्रकाशित केली होती.
सदरची नोटीस वाचून डोळसे व साक्षीदार चंद्रकांत मुथा यांनी लगेच मुरलीधर लुल्ला यांना समक्ष भेटून वृत्तपत्रात आलेली नोटीसही त्यांना दाखविली व त्यांना सांगितले की, तुम्ही मला सदर दुकानाची खरेदी द्या मी तुमची उर्वरीत रक्कम खरेदी झाल्याबरोबर तात्काळ देतो. त्यावेळी लुल्ला हे डोळसे यांना म्हणाले,‘किशोर लुल्ला यांच्याबरोबरचे वाद मिटवतो व तुम्हाला खरेदी देतो’, असे सांगून अद्यापपर्यंत टाळाटाळ करून वेळ काढुपणा करून खरेदी न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार नितीन गाडगे करीत आहे.